पान:आमची संस्कृती.pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १६३

लागू नये म्हणून हरप्रयत्न चालू असतात. अभ्यासाला एकसारखा प्रतिकार होत असतो. वाटेल तितक्या नोटिसा लावल्या तरी सर्व विद्यार्थी 'ट्युटोरियल' लिहून आणून देत नाहीत. शंभर विद्याथ्र्यांच्या वर्गात आठ दिवस मुदत देऊन घरून काही अभ्यास लिहून आणावयास सांगितला तर कधीही सर्व शंभर मुले तो आणणार नाहीत! जी आणतील त्यापैकी समाधानकारक कितींचा हा प्रश्न वेगळाच!

 शिक्षण कुचकामाचे ही वृथा ओरड!
 ह्या झाल्या विद्यापीठातील अडचणी. ह्यांशिवाय मोठी अडचण म्हणजे अभ्यास करावयास जी सामाजिक परिस्थिती लागते ती नाही. आपल्या बहुसंख्य देशबांधवांना शिक्षण घ्यावयाची जी संधी मिळत नाही ती आपल्याला मिळाली आहे, आपण त्याचा शक्य तितका जास्त उपयोग करून घेतला पाहिजे अशी भावना असेल तर विद्यार्थी अभ्यास करतीलच करतील. पण विद्याथ्र्यांना तसे वाटावे असे वातावरण समाजात नाही. सर्व लोकांनी हल्लीचे शिक्षण कुचकामाचे म्हणून ओरड केली तर शिक्षणाबद्दल प्रेम व आदर नष्ट होतात व शिकवणारा बोलला किंवा त्याने शिक्षा केली तर ते योग्यच आहे असे वाटेनासे होते.
 हल्लीचे शिक्षण कुचकामाचे आहे अशी ओरड सायन्स, एजिनिअरिंग, वैद्यक, शेती वगैरे शिक्षणाबद्दल नसते. ती बी.ए. व एम.ए.बद्दल असते. सध्याच्या शिक्षणक्रमाबद्दल विस्ताराने लिहिण्याचे हे स्थान नव्हे. पण ते शिक्षण व त्याचे कार्य हे थोडक्यात काय आहे ते पाहणे परीक्षांबद्दल बोलताना अस्थानी होणार नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून एम.ए.पर्यंत प्रत्येक विद्यार्थी जगाचा सांस्कृतिक इतिहास, जगाचा भूगोल, नागरिकत्व म्हणजे काय, हिंदुस्थानचे राज्यतंत्र, काही उत्तम इंग्रजी वाङ्मय, तर्कशास्त्र किंवा गणित, मातृभाषा हे विषय शिकतो व तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, राजनीती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, मराठी वगैरे भाषा इत्यादी विषयांपैकी एक किंवा दोन ऐच्छिक विषय म्हणून शिकतो. ह्यांत कुचकामाचे असे काय आहे हेच कळत नाही. एखाद्या खंडप्राय देशात लक्षावधी कारकून, अधिकारी वर्ग, शिक्षक हे लागणार आणि ते बहुसंख्य