पान:आमची संस्कृती.pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १६१

(विद्यापीठस्थापना दिन, शिवजयंती, टिळक जयंती आणि नेहमीचे धार्मिक सण, तसेच आंतरमहाविद्यालयीन सामन्यांकरिता तीन दिवस इत्यादी) आणि प्रत्येक महाविद्यालयाच्या विशिष्ट सुट्या (नियामक मंडळातील अगर शिक्षकांपैकी कोणी मृत झाल्यास, तसेच प्रत्येक महाविद्यालयाचे संमेलन, स्थापनादिन इत्यादी) सुमारे ५ ते ६ असे एकूण सुमारे ६० दिवस वगळले म्हणजे १६८ दिवस केवळ शिक्षणाकरिता उरतात. त्यांतलेही दर टर्ममध्ये ७-८ दिवस परीक्षेकरिता द्यावे लागतात. म्हणजे दोन्ही टर्ममध्ये १२-१५ दिवस वाढले; म्हणजे सुमारे १५० दिवस अभ्यासाकरिता उरतात. बी.ए. किंवा बी.एस्सी. ह्यांची फी वर्षास २५० ते ३०० रुपये असते हे लक्षात घेतले म्हणजे एक दिवस फुकट घालवणे म्हणजे पालकांचे किती पैसे फुकट घालवण्यासारखे आहे हे सहज समजेल. आणि तरीही विद्यार्थी अगदी क्षुल्लक कारणाकरिताही काडीमात्र विचार न करता सुट्टी मागण्यास तयार असतात! बरे, वर्षात जो अभ्यास करावयाचा असतो तो कायमचा असतो. तेव्हा सुट्टीमुळे अभ्यास बुडाला म्हणजे एक तर नेमलेला सर्व भाग वर्गात होऊ शकत नाही, किंवा सुट्टीच्या दिवशी जादा तास घेऊन सर्व भाग करावा लागतो. म्हणजे कसेही पाहिले तरी सुट्टीमुळे विद्यार्थ्याचा कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. केवळ तात्कालिक ‘सुटका' ह्यापलीकडे त्याला किंमत नाही. पण हा विचार कोणी करीत नाही.
 सुट्टयांखेरीज किंवा सुट्यांच्याच जोडीला अभ्यासाखेरीज इतर कार्यक्रमांमध्येही विद्याथ्र्यांचा बराच वेळ जातो. खेळ, नाटके बसवणे, वादविवादसभा, एन.सी.सी. वगैरे कार्यक्रम चालू असतात. प्रत्यक्ष व्याख्यानाखेरीज विद्यार्थ्यांना कॉलेजात मोकळा वेळ पुष्कळच असतो व अभ्यास करूनही ह्या कार्यक्रमांना भरपूर वेळ मिळणे शक्य असते. पण ह्या कार्यावर कित्येकदा एवढा भर दिला जातो की अभ्यासाकडे मुलांचे लक्ष लागत नाही. इंग्लंडात खेळांना महत्त्व बरेच आहे. शाळांतून व कॉलेजांतून सामने चालू असतात. युरोपातील इतर देश इंग्लंडच्या मानाने गरीब असल्यामुळे तेथे खेळांचे बंड नाही. युनिव्हर्सिटीतर्फे कोण खेळाडू आहेत हे बहसंख्य विद्याथ्र्यांना माहीतही नसते. खेळणारे खेळत असले तरी त्याची दखल युनिव्हर्सिटी कधीही घेत नाही. युनिव्हर्सिटीचा मुख्य व