पान:आमची संस्कृती.pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १४५

नाही, तर पहिले नावसुद्धा बदलते. आपल्या स्वत:च्या आवडीनावडी विसरून नव-याच्या आवडी त्या आपल्या करावयाच्या असतात. तो हसला की आम्ही हसतो, तो रागावला की आम्ही कोमेजतो. त्याने कामाच्या चिंतेत आमची विचारपूस केली नाही तर त्यांचे प्रेमच नाही म्हणून आम्ही आयुष्याचे रान करतो. दुस-या बाईशी दोन शब्द बोलला तर आमचा मत्सर जागृत होतो. ह्या अनन्यभक्तीचे फळ म्हणजे शेवटी आमच्या धन्यालाच आम्ही साखळीने जखडून गुलाम बनवितो. मुले झाली म्हणजे आमचा जीव त्यांच्याभोवती घोटाळतो. त्यांनी दृष्टीआड जाऊ नये म्हणून आमची खटपट सुरू असते व त्यांचे पंख कापून त्यांना आमच्या आकुंचित जिण्यात कोंडून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

 सावलीतील वनस्पती
 एका बाजूला धडधडीत अन्याय व दुस-या बाजूला अनुकंपेमुळे मिळालेल्या जादा सवलती हे दोन्हीही आम्हांला नको. ना खत ना पाणी, शेळीने खावे, सर्पणासाठी कापावे-- अशा माळारानावर जगणाच्या खुरटलेल्या बाभळीचेही आयुष्य आम्हांस नको व उन्हाची झळ लागू नये म्हणून सावलीत परिश्रमाने वाढवलेल्या चित्रविचित्र रंगांच्या फोफावलेल्या वनस्पतींची मिजास पण आम्हांला नको आहे. ह्या परावलंबी, परप्रकाशी जिण्याचा आम्हांला अगदी वीट आला आहे. आम्हांला सामाजिक हक्क पाहिजेत व सामाजिक जबाबदा-या आमच्यावर पडाव्या ही पण आमची इच्छा आहे. आमच्या शारीरिक व मानसिक शक्तीचा पूर्णाशाने उपयोग करता येईल असे आम्हांला पाहिजे. माझा नवरा, माझी मुले, माझे स्वयंपाकघर ह्या विवंचनेत सबंध आयुष्य घालवायचे एवढी तुटपुंजी माझी शारीरिक व बौद्धिक संपत्ती खास नाही. हजारो वर्षे जगाच्या निरनिराळ्या भागांत खपून मनुष्यांनी एक प्रचंड संस्कृती निर्माण केली आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने?' इतकी विशाल संपत्ती आहे व मी त्याची वारस आहे. त्या संस्कृतीच्याबरोबर अनंत दु:खे व अनंत अन्याय मनुष्याने निर्माण केले आहेत. त्यांचीही मी वारस आहे. एकाचा उपभोग व दुस-याचे निवारण करण्याची धडपड मी जन्मभर केली पाहिजे. समाजाचे घेणे घेतले पाहिजे व देणे दिले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी