पान:आमची संस्कृती.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१४४ / आमची संस्कृती

 हे सारे पुरुषांचे हक्क!
 पूर्वी सर्व त-हेची भूषणे-शिरोभूषणे, कर्णभूषणे, गळ्यातील व हातांतील अलंकार, शरीरावर गोंदणे व निरनिराळे रंग फासणे हा पुरुषांचा हक्क समजत. समाजात जे काही महत्त्वाचा हक्क बजावीत त्यांनाच हा अधिकार असे. राजा, उपाध्याय, शूर लढवय्या ह्यांनाच शिरोभूषणे लेण्याचा किंवा शरीर गोंदण्याचा अधिकार असे. अलंकार हे पुरुषार्थाचे द्योतक समजत. पण हल्ली पुरुष स्वत:चे शरीर अलंकृत न करता आपल्या पुरुषार्थाची जाहिरात आपल्या बायकोकरवी लावतात! बायकोचे रूप, अलंकार व वस्त्रे ही तिच्या नव-याच्या सामाजिक दर्जाची द्योतक असतात.
 मोलकरीण रडत होती, “बाई आठ मुलं झाली. त्यांतली ही एक मुलगी तेवढी जगली. ह्या खेपेला मुलगा होऊन जगला-वाचला तर धडगत आहे. नाही तर ते दुसरं लग्न करतील!
 शेजारच्या एका बाईने अफू खाऊन जीव दिला! दीड महिन्यांची बाळंतीण, चवथी खेप, मूल उपजताच मेलेले. सगळी माणसे अपेशी म्हणतात; सासरची घरात घेणार नाहीत म्हणून जीव दिला!
 तुम्ही म्हणाल, “नव-यानं अलंकार दिले तरी त्या बाईची कुरकुर, घरांतून हाकून लावलं तरी कुरकुर, लोणी मिळत नाही म्हणून तक्रार व साजूक तूप मिळतं म्हणूनही तक्रार. ह्या बायकांना हवं तरी काय? लोणी मिळो वा न मिळो, आम्ही माहेरच्या पाव्हण्याच. काही घरात आम्ही दुस-याच्या होणार म्हणून आमची हिडिसफिडिस, तर काही घरात त्याच कारणामुळे आमच्याबद्दल अनुकंपा. माहेरच्या कशावर आमचा हक्क नाही आणि कशाबद्दल जबाबदारी नाही. सासरी खायला-प्यायला पुरेसे मिळत नाही, अशा स्थितीत माहेरचे आणून हक्काने खाता येणार नाही, काही मिळालेच तर ती धर्माची भाकर. तसेच माहेरचे माणूस उघडे पडले, तर इच्छा असूनही त्यावर मायेचे पांघरूण घालता येत नाही. सासरी काय, आम्ही बोलूनचालून उपन्या आलेल्या! आपल्या मुलाच्याच पोटी मूल होऊन नातवंड पाहावयास मिळते, तर कोठची सासू सुनमुख पाहण्यास उतावीळ झाली असती? नव्या घरी पाऊल टाकल्यापासून नव-याचे जीवन तेच आमचे जीवन अशी स्थिती होते. नुसते आडनावच बदलून राहत