पान:आमची संस्कृती.pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १४३ काही विचारप्रवर्तक प्रसंग
 दुसरा प्रसंग माझ्या लहानपणाचा आठवतो. आम्ही भावंडे जेवायला बसलो होतो. सर्व मुलग्यांना बाजाराचे तूप वाढले; मला मात्र घरचे साजूक तूप मिळाले. “आई, तीच का ग तुझी लाडकी? एका भावाने नित्याचा प्रश्न केला. “अरे, ती आपल्या घरची दोन दिवसांची पाहुणी. उद्या लग्न झालं की कशाला धरते आहे, साजूक तुपाचा हट्ट सासरी? खाऊ दे तिला. आईने नित्याचेच ठरलेले उत्तर दिले. हा झाला दुसरा प्रकार.
 बाप मुलाला आर्टस कोर्स न घेता इंजिनियर नाहीतर डॉक्टर होण्यासाठी सांगत होता. मुलीने विचारले, “बाबा, मी आर्टसकडे गेले तेव्हा मला नाही हो सांगितलंत, आर्टस कोर्स कुचकामाचा म्हणून?
 बाप म्हणाला, “अगं; तू काहीही शीक. तुझं शिक्षण आहे दिखाऊ; त्याचं शिकणं आहे पोटासाठी! बापाने मुलांतील व मुलीतील भेद विशद करून सांगितला.
 ह्या झाल्या माहेरच्या गोष्टी. आता लग्नानंतरचे स्त्रियांचे काही अनुभव सांगते.

 सासूबाई खुशीत होत्या. “सूनबाई, आज दहा वर्षे माझ्या मुलाचा संसार करते आहेस; त्याचं घर राखते आहेस. अशीच पुढं राख हो. मुलाचा संसार, त्याचं घर! मला वेडीला वाटत होते- मी माझाच संसार करीत होते म्हणून!
 “अमक्या-तमक्याच्या नातवाची मुंज आहे म्हणून ऐकतो. असे म्हणून एका गृहस्थाने मुंजा मुलाच्या आईच्या बापाचे नाव घेतले. ताबडतोब मुलाच्या बापाची आई उसळून म्हणते, "अहो, आमचा नात सूनबाईच्या माहेरच्या नावावर विकला जाण्याची नाही वेळ आली अजून!...
 -एक नावाजलेले डॉक्टर आपल्या पत्नीला बजावीत होते. हे पाहा, बाहेर जाताना साधंसुधं लुगडे नेसून जाऊ नकोस. तुझ्या पोषाखावरून माझ्या दांडग्या प्रैक्टिसची लोकांना कल्पना आली पाहिजे. समजलीस?