पान:आमची संस्कृती.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८ / आमची संस्कृती

 कर्ता-करविता कोण?
 व्यक्ती व संस्कृती ह्यांचे परस्पर संबंध काय?
 आपण आताच पाहिले की, व्यक्तीला उपभोग्य वस्तू व व्यावहारिक विधिनियम, वैचारिक विश्व ही समाजाकडून वारशाने मिळतात. स्वत:च्या दोन क्षुद्र हातांनी त्याच्या भोवतालच्या उपभोग्य वस्तूंची निर्मिती झालेली नसते. ताटे, वाट्या, अन्न शिजवायची भांडी, लुगडी-धोतरे, अंथरुणेपांघरुणे, राहते घर, गावातील रस्ते, विजेचे दिवे, भाज्या, धान्य, फळे, साखर-गूळ इत्यादी पदार्थ, पुस्तके, मंदिरे, ह्यांपैकी किती बरे आपण आपल्या हातांनी बनवलेले असते? हे पदार्थ बनवायला लागणारी कला व ज्ञान हे काय एका व्यक्तीने व एका पिढीने निर्माण केलेले असते? तसेच स्वराज्य, सुराज्य, कुटुंब, गावगाडा, पूर्वजन्म, पापपुण्य ह्या समाजसंस्था व मूल्ये काय व्यक्तीने बनविलेली असतात? व्यक्ती ज्या समाजात जन्मते, त्या समाजातील संस्कार उचलते.
 आपल्याभोवतीच्या समाजातील काही लोक हिंदू आहेत, काही ख्रिश्चन तर काही मुसलमान आहेत; पण त्यांपैकी प्रत्येकाला आपापल्या धर्माचा जाज्वल्य अभिमान आहे. पण आपण कधीतरी असा विचार केला आहे का, की ज्या धर्माचे आपण अनुयायी आहोत तो धर्म आपण स्वीकारण्याची कारणे काय बरे? चांगल्या-वाईटाचे तारतम्य येण्याआधीच आपण त्या त्या धर्माचे अनुयायी झालेले आहोत. आपण धर्म स्वीकारला नाही, धर्माने आपणास स्वीकारले आहे, आत्मसात केले आहे.
 संस्कृती सगळ्या इंद्रियांना-कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व बुद्धी ह्यांना वळण लावते. व्यक्ती ज्या समाजात जन्माला येते, त्या समाजाचे सांस्कृतिक वळण ती उचलते. मराठी आईबाप असल्यामुळे व मराठी कुटुंबात वाढल्यामुळे मी मराठी भाषा बोलते. सर्व भाषांत सुंदर म्हणून जाणूनबुजून निवड करून काही मी मराठी भाषा बोलावयास शिकले नाही. पुण्यात राहणे झाल्यामुळे माझ्या जिभेला बाजरी आवडते व पोटाला ती सोसते. परवाच आगगाडीत एक गृहस्थ भेटले. ते चाकणचे वर्णन करीत होते. बाकी सर्व ठीक आहे; पण ती बाजरी तोंडात घालवत नाही. कधी एकदा सातारचा शाळू खाईनसं झालं आहे!' धान्यनियंत्रणाच्या दिवसात बिचाऱ्या भातखाऊ बंगाली व मद्रासी लोकांचे कसे हाल झाले हे सर्वांना