पान:आमची संस्कृती.pdf/149

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१४२ / आमची संस्कृती

सामाजिक अन्यायाखाली दडपलेल्या बहुसंख्य मानवांची सुटकेसाठी जी प्रचंड चळवळ चालली आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे आमची चळवळ आहे. ज्या प्रमाणावर सामाजिक अन्यायाचा सबंध प्रश्न सुटेल त्या प्रमाणावर व तेव्हाच आपलाही प्रश्न सुटेल. हे जर खरे, तर मग स्त्रियांच्या प्रश्नाचा सवता सुभा कशाला? सामाजिक अन्याय हे नाव जरी एक असले तरी व त्याविरुद्ध करण्यात येणा-या चळवळी तत्त्वत: एकच असल्या, तरी वास्तविक प्रत्येक वर्गाचा समाजाशी येणारा संबंध निरनिराळा असतो; त्यावर होणारी समाजाची क्रिया व प्रतिक्रिया ह्या इतर वर्गापेक्षा निराळ्या असतात. अर्थातच संघटनेचे स्वरूप व लढाईचे मार्गही निरनिराळे आखावे लागतात. गिरणीकामगारांची संघटना व शेतक-यांची संघटना ही जरी तात्त्विकष्ट्या एका त-हेची असते तरी दोन्ही वर्गाना आपापल्या सामाजिक स्थानानुरूप संघटनेची व कार्याची दिशा आखावी लागते. तसेच स्त्रियांच्या बाबतीत. त्यांचेही प्रश्न त्यांच्या वर्गाचे विशेष असे असतात व म्हणून स्त्रियांची अशी निराळी संघटना सर्वत्र दिसून येत आहे.
 आम्हा स्त्रियांना आज वाचा का फुटली हे प्रथम सांगितले. आता आम्हाला हवे आहे तरी काय हा पुढचा प्रश्न. त्याचे थोडक्यात उत्तर देण्याच्या आधी मी पाहिलेल्या व अनुभवलेल्या अनेक प्रसंगांतील काही निवडक प्रसंग सांगते. यावरून आमच्या मनात काय शल्य बोचते ते तुमच्या ध्यानात येईल.
 माझ्या ओळखीच्या सुखवस्तू सुशिक्षित कुटुंबातील गोष्ट. आजी वाढीत आहे. भाकरी वाढली; लोणी वाढताना नातवाच्या पानावर पोफळाएवढा लोण्याचा गोळा घातला; नातीच्या पानावर वालाएवढे लोणी टेकवले. थोरल्या नाती मुकाट जेवल्या, धाकटीला काही राहवेना.
“आजी, आम्हांला ग का एवढं लोणी?
 “अग तो मुलगा आहे; तो पुढे घर चालवणार आहे- तुम्ही काय? लग्न होऊन दुस-याच्या होणार!  आम्हांला वागवण्याची ही झाली एक तन्हा.