पान:आमची संस्कृती.pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १४१









१२. आम्ही बायका




 आम्ही बायका हजारो वर्षे मुक्या होतो. आम्ही काय आहोत, आम्हांला काय पाहिजे हे दुसरे बोलून दाखवीत. आम्हांला त्याची पर्वाच नव्हती. कोणी आम्हांला सर्व पापाचे मूळ समजत, तर कोणी आमची पूजा बांधीत; कोणी फुलासारखे वागवावे म्हणत, तर कोणी ‘‘दिसाआड बैल व तासाआड बायको मारावी अशा मताचे होते. ऐन तारुण्यात स्त्रीला जगातील सर्वात विलोभनीय गोष्ट मानून कोणी शृंगारशतके रचीत व शृंगाराचे अजीर्ण झाले म्हणजे शिसारी येऊन तीच माणसे वैराग्यशतके खरडून काढीत. सारांश, काय, आमच्या धन्याच्या मन:स्थितीवर आमचे जगातील स्थान अवलंबून होते व आहेही. मग आताच बायकांना वाचा का फुटली?

 आक्रोशाचे युग
 दलित वर्गाच्या आक्रोशाचे हे युग आहे. शेतावरला शेतकरी किसान मोर्चे काढून आपली दु:खे वेशीवर टांगीत आहे. गिरणीतील मजूर मजूरसंघाच्या द्वारे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतात तसेच स्त्रियाही आपल्या सभांतून आपली खरी व काल्पनिक दु:खे जगापुढे मांडून दाद मागतात. स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही.