पान:आमची संस्कृती.pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १३९


नायिकेच्या जागी कल्पून घेता येते. या क्रियाहीन करमणुकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीमुळे करमणूक होत राहण्यास ती जास्त जास्त भडक असावी लागते. स्वत: चालले, कुस्ती खेळले, पोहले म्हणजे मनुष्य दमतोच. मनुष्याची कामवासना कितीही तीव्र असली तरी तीही काही मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. पण क्रियाहीन करमणुकीच्या प्रकारांत इद्रिये दमण्याचा प्रश्नच नसतो. तेच तेच पाहून बेचव वाटू लागते. म्हणून शृंगार जास्त जास्त उत्तान, विनोद जास्त जास्त बोचक, हाणामारी जास्त जास्त भयंकर करावी लागते. इतके सगळेही करून सिनेमा जिवंत राहण्याची खात्री न पटल्यामुळे हल्ली प्रचंड मोठ्या पडद्यावर, वास्तवापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर व सृष्टीतील घनता व खोली दाखवता येईल अशा त-हेचे चित्रपट दाखवितात. या चित्रपटात गोष्ट, भावनांचे आविष्करण वा प्रसंगांचे चित्रण यांपैकी कशांतही हळुवारपणा, कौशल्य, सूक्ष्म व सूचक स्वभावरेखन, ध्वनित केलेल्या छटा यांपैकी काहीही नसते. सर्व प्रसंग असे निवडलेले असतात की, त्यांत भयानक समरप्रसंग व स्त्रीच्या उघड्या अंगाचे जास्तीत जास्त प्रदर्शन व्हावे. हल्लीच्या युगात स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे जेवढी बाजारी प्रदर्शन चालते तसे पूर्वी कधीही नव्हते.
 अशा परिस्थितीत व्यायाम, खेळ, शारीरिक कष्ट यांची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. एका बाजूला गरिबी, तर दुस-या बाजूला पूर्वी पाहिली नाही अशी चैन दिसते. त्यांपैकी काही चैन पैशाने स्वस्तात पडते. पण मुलांना घातक ठरते. अशा परिस्थितीत मुलांपेक्षा मोठ्या माणसांचीच जबाबदारी वाढलेली आहे. आई, बाप, शिक्षक, नगरपालिका, राज्यकर्ते सर्वानीच ही जबाबदारी ओळखून मुलांना राहावयास योग्य असे जग निर्माण केले पाहिजे. वागणुकीच्या बाह्य स्वरूपात कालमानाप्रमाणे फरक पडेल, पण काही मर्यादा सर्वकालीन असतात. धर्म, अर्थ, काम हे. साधताना नातिचरामि' हे ब्रीदवाक्य सर्वांनी ध्यानात बाळगले पाहिजे. माझा अर्थकाम साधताना, इतरांना न दुखवता, इतरांचे हरण न करता मी तो साधीन हे मुलांना व मोठ्यांना सगळ्यांनाच कळले पाहिजे. रस्त्यात जाताना इतर चालत आहेत व वाहने धावत आहेत, रस्ता सोयीने वापरला तर सगळ्यांना सुख होईल, बसमधून जाताना जोरजोराने हसून बोलून