पान:आमची संस्कृती.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १३५


मोठ्यांचे विश्व संकुचित असे. आपले कुटुंब हेच विश्व कित्येक वर्षे मुलांचे असे. मुलगे व मुली हल्लीइतक्या लहानपणी शाळेत जात नसत. त्याचप्रमाणे घराबाहेरचे मोठे विश्व म्हणजे शाळा होती. ती नुसती शिक्षणाचे साधन नसून करमणुकीचेही साधन असे. आई-बाप मुलांवर करडी देखरेख ठेवीत, असेही म्हणवत नाही. मुली शाळेत जात नसल्यामुळे बहुतेक घरीच असत. आता घरचे व बाहेरचे जग बदलले आहे. घरची शिस्त व आईबापांची देखरेख नुसती जास्त पाहिजे असे नव्हे, तर समजून पाहिजे व जितकी मुलांवर हवी तितकीच स्वत:वरही हवी. हल्लीच्या पिढीत जीवन कितीतरी गुंतागुंतीचे व अवघड झाले आहे.
 मुलींच्या वागणुकीतील फरक
 कोकणातले खेडे राहिलेच, पण पुण्यासारख्या शहरांतसुद्धा मुलाचे लक्ष वेधेल अशा गोष्टी किती कमी होत्या! फर्गुसनपासून हुजूरपागेपर्यंत चालत गेले तर ‘वामन गोपाळ यांचा सार्सापरिला' व कधी कधी ‘संगीत सौभद्र' संगीत मानापमान' या जाहिराती दिसत. दुकानांना मोठमोठ्या काचेच्या खिडक्या व त्यांत आकर्षक रीतीने मांडून ठेवलेले जिन्नस कधीच दिसत नसत. इराणी लोकांची चहा-फराळाची दुकाने तर मुळीच नव्हती. मुख्य म्हणजे निरनिराळ्या सिनेमांतील रंगीत दृश्ये, व त्यांत काढलेले वास्तवापेक्षा आकाराने कितीतरी मोठे व रंगाने कितीतरी जास्त भडक स्त्री-पुरुष तर डोळ्यापुढे नसतच. घरचे गरिबीचे वातावरण, क्वचित एखाद्या लहान बोळांतल्या मोठ्या वाड्यात तीन चार खोल्यांचे बिहाड, सर्व चुली पेटल्या म्हणजे वाडाभर धूर, या सर्वांतून बाहेर जाऊन शाळेत चारपाच तास घालवावयाचे म्हणजे एक त-हेची पर्वणीच वाटावयाची. शाळेत काय किंवा घरी काय, वाचावयास जे वाङ्मय मिळे ते हल्लीच्या मानाने अतिशय कमी व अतिशय निराळ्या त-हेचे असे. घरात मुलींना किंवा मुलांना कसे वागावयाचे याचे धडे सारखे केव्हाही मिळत नसतच. पण विशेषत: मुलींना घरात लहानसहान कामे असत. आपले, क्वचित एखाद्या लहानसहान भावंडाचे कपडे धुणे, थोडे पाणी भरणे, पाटपाने करणे, उष्टी काढणे व खालच्या भावंडांना खेळवणे ही कामे तर नेहमी असत. पण त्याशिवाय आई बाहेरची झाल्यावर तीन दिवस स्वयंपाक