पान:आमची संस्कृती.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १३३

मनोवृत्ती हळूहळू मरून जातात, मन धर्माचरणाकडे लागते. घरची मंडळी सात्विक वृत्तीची असतील तर घरात मान मिळतो. प्रेम मिळते व अशा बाया त्यागमय व प्रेममय होऊन राहतात. त्यागाची सुरुवात जुलमाने असली तरी तो अंगी बाणतो-पण त्यांच्या त्यागावर व प्रेमावर पोसून त्यांचे गुणगान करणारे कुटुंबीय मात्र स्वार्थी किंवा स्वार्थी नसल्यास आंधळे असे मला खचित वाटते. लहानपणी अशा व्यक्तींच्या सहवासात मन उदात्त बनेल, ह्या व्यक्तींच्या त्यागाची मुळे कशात आहेत ते कळणार नाही. पण मोठेपणी तरी त्यावर विचार सुचून निदान करुणा तरी उत्पन्न झाली पाहिजे. तीही उत्पन्न न होणारे व स्वत:च्या विधवा बहिणी, भावजया, मावशा, आत्या, ह्यांच्याकडून कुटुंबाची विनामूल्य यथेच्छ सेवा करून घेणारे व समाजात मानसन्मान असलेले कितीतरी पुरुष व स्त्रिया मी पाहिल्या आहेत. अशा त-हेच्या त्यागाने त्या विशिष्ट व्यक्तीचा काय गुणविकास होत असेल तो होवो, पण कुटुंबावर व समाजावर होणारा परिणाम खात्रीने इष्ट नाही.
 दुस-या काही स्त्रिया एकत्र कुटुंबातील काही पुरुषांच्या कामवासनेला बळी पडतात. व्यवहारांतही खुषीपेक्षा जुलूमजबदरस्ती जास्त असे. संन्यास जसा जुलमाचा, तशाच जुलमाने घरातील भोगदासी होऊन काहींना राहावे लागते. ह्या दु:खाला वाचा फोडता येत नाही. घरातल्या ब-याच जणांना हा प्रकार माहीत असूनही प्रतिकार करण्याची छाती नसे.
 तिस-या प्रकारच्या विधवा स्त्रिया फशी पडत. घरात कोणीच त्राता नसल्याने घर सोडून जावे लागे व त्या धंद्यांत पडत. अशा स्त्रियांचे अतिवास्तव चित्रण कै. हरिभाऊ आपट्यांनी आपल्या कादंब-यांतून केलेले सर्वांनी वाचलेच असेल.
 चौथ्या त-हेच्या बाया वडीलधारे माणूस असेल तोवर ताटाखालचे मांजर असतात. एखादा मुलगा असेल तर तो मोठा होऊन मिळवू लागेपर्यंत गुलामगिरीत राहतात. पण त्यांच्या नशिबाने तो मिळवता झाला तर त्याचे लग्न लावून देऊन सुनेला यथेच्छ छळून काढतात. ह्या स्वत: संसारातून अशा वेळी उठलेल्या असतात की, त्यांच्या सर्व वासना अपु-या राहिलेल्या असतात व त्या त्या सुनेच्या संसारातून पुरवू बघतात. मुलाचे