आमची संस्कृती / ७
ह्याचे ठराविक साचे असतात. त्याचप्रमाणे धर्म, नीतिमत्ता ह्यांबद्दलही ठराविक कल्पना असतात. ह्या सर्व साचेबंद कल्पना व्यक्तीच्या जीवनाला वळण लावतात व ह्या सर्व परंपरागत् आलेल्या असतात. आई-मूल, नवरा-बायको, भाऊ-भाऊ वगैरे असंख्य कौटुंबिक नाती, सेव्य-सेवक, नायक-अनुयायी, राजा-प्रजा, शिक्षक-शिष्य वगैरे विविध व्यावहारिक नाती व त्यामध्ये परस्परांशी वागणूक ही व्यक्तींची निर्मिती नसते. ही नाती व त्यापरत्वे करावयाची वागणूक जन्माला आल्या दिवसापासून व्यक्ती शिकत असतो. योग्य-अयोग्य, न्याय्य-अन्याय्य, धार्मिक-अधार्मिक, पाप-पुण्य, देव-राक्षस, ईश्वर व सृष्टी ह्या सर्व कल्पना परंपरेने आलेल्या आहेत व व्यक्ती त्या थोड्याबहुत प्रमाणात आत्मसात करते. त्या इतक्या आत्मसात होतात की, त्या स्वत:च्याच असे व्यक्तीला वाटू लागते व देहांधतेने जीव जसा मायाजाळात गुरफटून जातो, त्याप्रमाणे संस्कृतीच्या पसाऱ्यात गुरफटून हे माझे, 'हे माझे,'हे उत्तम', 'हे उत्तम' अशा संभ्रमात व्यक्ती पडते.
मनुष्यनिर्मित पदार्थमय जग व कल्पनामय जग म्हणजे संस्कृती. इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्यही पोटाच्या विवंचनेत काळ घालवतो व त्या पोटाच्या विवंचनेतूनच ह्या संस्कृतिमय जीवनाची निर्मिती झाली आहे. प्राचीन काळी पृथ्वीवर मनुष्यवस्ती विरळ, आपल्या पायांखेरीज दळणवळणाचे साधन नाही, अशा वेळी एकमेकांपासून लांब राहणारे मनुष्यसमाज बरेचसे स्वतंत्र असे समाजजीवन जगत असत. ह्या आदिकालात निरनिराळ्या युक्त्या मानवाने हस्तगत केल्या व त्यांच्यात निरनिराळ्या वेळी निरनिराळी भर घातली. मानवाची निर्मिती बीजगुणविशिष्ट व जातीविशिष्ट नसल्यामुळे नित्योपयोगी वस्तुंपासून तो अतिशय कठीण आध्यात्मिक विचारापर्यंत प्रत्येक समाजाची कृती इतर समाजांपेक्षा थोडीथोडी निराळी होऊ लागली व देशकालपरत्वे मानवी संस्कृतीचे निरनिराळे प्रवाह वाहू लागले.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला संस्कृतीची देणगी दिली जात असता तिच्यात प्रत्यही फरक पडत असतो. कोणतीही संस्कृती स्थिर व अचल नसते. काही कालखंडात मोठे फरक पडतात तर एरवी हळूहळू संस्कृती बदलत असते.