पान:आमची संस्कृती.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १३१होईल ह्या भीतीने कोणच्याही वाहनाने न जाता पायी चालतात. वर्षाकाठी हजार मैल तरी त्यांचे चालणे होत असेल. किती थकले भागले किंवा आजारी पडले तरी गृहस्थाश्रमी लोकांकडून कसलीही सेवा करून घेत नाहीत. दिवसा निजत नाहीत. पायांत जोडा घालीत नाहीत. लेखन, चित्रकाम, स्वत:चा कमंडलु व खाण्याचे भांडे लाकूड तासून तयार करणे किंवा लाखवणे, दोरया, गोफ (ग्रंथ बांधण्यासाठी किंवा चवरी करण्यासाठी) विणणे, कापड शिवणे असा उद्योग हाताने चाललेला असतो. अखंड चिंतन, मनन व वाचन चालू असते. दरवर्षी गुरू आज्ञा देईल त्या भागात संचार असतो. हे सर्व स्वामी तरुण म्हणजे तिशीच्या आतील होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, दहाव्या वर्षी, अकराव्या वर्षी दीक्षा घेतल्या होत्या व तेव्हापासून पहिल्याने अध्ययन व नंतर अव्याहत संचार चालू आहे. कोणीही मनुष्य (पुरुष किंवा बाई) तीस वर्षांचे व्हावयाच्या आत त्याला अशा त-हेची शिक्षा देणे हा गुन्हा होईल असा कायदा सध्या भारत सरकार करीत आहे, त्याविरुद्ध स्वामी प्रचार करीत होते. स्वामींचे वाचन, अभ्यास, तपस्या, ह्या सर्वांबद्दलच्या आदराने माझे मस्तक नम्र झाले. तरुण वयात जगातील सर्व सुखे टाकून अखंड संचार करण्याच्या व्रताने आम्ही सर्व थक्क झालो, पण स्वामींच्या प्रचाराला माझ्याकडून होकार मिळेना, दहाव्या अकराव्या वर्षी ब्रह्मचर्य, संन्यासदीक्षा ह्याचा अर्थ तरी मुलांना कळेल का? त्या वेळी सर्वांसमक्ष घोषणा करून दीक्षा घेऊन, नंतर गुरुगृही राहून सर्वांच्या मेळाव्यात शिक्षण घ्यावयाचे असे ह्या पंथांतील बरेच लोक करतात. दीक्षा घेतल्यावर काडीचेही स्वातंत्र्य नसते. बालपण खडतर अशा यमनियमांत जाते. दिवसाचे चोवीस तास दुस-याच्या सान्निध्यात असल्यामुळे यमनियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. पुढे संचारास निघाले तरी कधीही एकटे नसतात. एकमेकांचे एकमेकांवर लक्षही असते. अशा त-हेने सगळीकडून बंदिस्त असले म्हणजे हळूहळू वैराग्य अंगी बाणतही असेल. पण अशाही परिस्थितीत पळून जाऊन परत गृहस्थाश्रमी बनलेले जैन गृहस्थ मी पाहिले आहेत. ह्या साधूची तपस्या व त्याग असामान्य तर खराच, पण तो त्याग त्यांनी केला की त्यांच्याकडून करवला गेला, हा प्रश्न मनामध्ये येतोच.