पान:आमची संस्कृती.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / १२३


पंजाबी, राजस्थानी, हिंदी आणि उडिया ह्या भाषांच्या वाङमयापेक्षा अधिक संपन्न व प्रगल्भ आहे. हिंदी भाषिकांची संख्या जरी इतर कुठचीही एक भाषा बोलणान्या लोकांपेक्षा अधिक असली तरी हिंदी भाषेतील वाङमय इतर भाषांच्या मानाने गुणाने व परिमाणाने जरा मागासच वाटते. उत्तरप्रदेशात मुसलमानी सत्ता १३ व्या शतकापासूनच प्रस्थापित झाली व त्यानंतर सुशिक्षित वर्गाने प्रथम पर्शियन व १९ व्या शतकात ऊर्दू ह्या दोन परकीय भाषा आत्मसात केल्या. बहुजन समाजाने हिंदी भाषा जिवंत ठेवली .
 दक्षिण भारतात द्राविड भाषांचे वाङमयीन कार्य अतिशय भरीव, डोळे दिपविणारे आणि जुने आहेतामीळ वाङमय सर्व आधुनिक भारतीय भाषांमध्ये सर्वात जुने तर आहेच पण आधुनिक युरोपीय भाषांच्या बाङमयापेक्षाही जुने आहे. उत्तरेकडील भारतीय भाषा अस्तित्वात येण्याच्या आधीपासून तामीळ, तेलगु व कन्नड ह्या भाषा अस्तित्वात होत्या व त्यांची वाङमयीन परंपरा मोठी जोमदार असून दक्षिणेकडे उगमपावलेल्या तत्त्वज्ञानविषयक व धार्मिक विचारप्रवाहांची सर्व भारतावर छाप पडलेली आहेही परिस्थिती लक्षात घेतली म्हणजे रशियन व हिंदी ह्यांच्या स्थानातील मूलभूत फरक ध्यानात येईल. भारतीय भाषा एकाच पायरीवर आहेत एवढेच नव्हे, तर त्यांतील काही हिंदीपेक्षा वरचढ असताना हिंदीला जे नवीन महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे त्याबद्दल इतर भाषिकांना थोडेसे वैषम्य वाटल्यास नवल नाही.
 रशियामध्ये रशियन भाषा ही संघराज्याची भाषा असल्यामुळे संघराज्यात रशियन भाषिकच मोठमोठ्या जागांवर सर्वत्र दिसून येतात. ह्याबद्दल इतर भाषिकांना फारसे वैषम्य वाटत नाही. कारण बाकीच्या बहुतेक भाषांतून लिहिलेले वाङमय जवळजवळ नाही. रशियन भाषिकांची संख्याही इतर सर्व भाषिकांइतकी किंवा कदाचित जास्तही असेल. बाहेरील जगाशी संबध ठेवायलाही ह्याच भाषेचा उपयोग रशियन लोक सर्रास करीत असत व हल्लीही करतात. रशियन भाषेचे स्थान तिला बाङमयीन मोठेपणाने व सांस्कृतिक हक्कानेच प्राप्त झाले आहे.

 ऐतिहासिक पार्श्वभूमी