पान:आमची संस्कृती.pdf/128

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १२१

होईल.
 उत्तर अमेरिकेच्या संघराज्यात जगातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या भाषा बोलणारे लोक येऊन वसाहत करून राहिले आहेत. तरीही संयुक्त संस्थाने हे एकभाषिक राष्ट्र आहे. असे होण्यास बरीचशी ऐतिहासिक व सांस्कृतिक कारणे आहेत. संस्थानात पहिल्यापासून बहुसंख्य इंग्रजी भाषिक लोक वसाहत करण्यास गेले. फ्रेंच वसाहती ह्या इंग्रज वसाहतवाल्यांनी नेपोलियनकडून विकत घेतल्या व इंग्रजी भाषिक वसाहतवाल्यांनी इंग्लंडपासून स्वतंत्र होऊन आपले निराळे राज्य स्थापले. जे काही थोडे डच, स्पॅनिश व फ्रेंच लोक होते त्यांना संख्याधिक्यामुळे व राजकीय सत्तेमुळे लवकरच इंग्रजी भाषिकांच्या वर्चस्वाखाली यावे लागले. एकदा राज्य स्थापन झाल्यावर गेल्या ५०/७५ वर्षांत इंग्रजी भाषिकांव्यतिरिक्त जे इतर लोक लाखोंच्या संख्येने संयुक्त संस्थानांत आले त्यांना नागरिकत्व मिळावयाच्या आधी इंग्रजी शिकावेच लागे. हे सर्व लोक आपल्या देशातील अन्नटंचाई किंवा राजकीय जुलूम ह्याला कंटाळून आसच्यासाठी आले होते. ह्या सर्व लोकांनी भरपूर अन्न, वस्त्र व स्वातंत्र्य ह्या तीन गोष्टींसाठी आपल्या भाषेची किंमत आनंदाने दिली. तरीही आज निरनिराळ्या भाषिकांचे गट, शाळा व वर्तमानपत्रे संयुक्त संस्थानात आहेत. मध्यवर्ती सरकार हे चालू देते, कारण ह्या भाषांना राजकीय जीवनात काडीचेही स्थान नाही.
 स्वित्झर्लंडमध्ये तीन भाषा आहेत व त्या तीनही भाषांना राज्यात समान स्थान देऊन स्वित्झर्लंडने हा प्रश्न सोडवला. ह्या तीन भाषांमध्ये रोमॅन्स ह्या चवथ्या भाषेचीही नुकतीच भर पडली आहे. सगळ्या भाषांना समान स्थान देणे ह्या चिमुकल्या देशाला शक्य झाले. कारण, तेथे चारच भाषा आहेत, भारतासारख्या चौदा नाहीत. दुसरे म्हणजे इटालियन, फ्रेंच व रोमॅन्स ह्या जवळच्या भाषा आहेत व जर्मन इतकी जवळची नसली तरी भाषाशास्त्रदृष्ट्या फार लांबची भाषा नाही. ह्या चौभाषिकांना एकमेकांच्या भाषा चटकन शिकण्यासारख्या आहेत. तरीही एवढ्याशा चिमुकल्या व मोठमोठ्या भांडकुदळ राष्ट्रांच्या मध्यावर असलेल्या ह्या राष्ट्रांत चार भाषा शेजारी नांदू शकतात, प्रत्येकाला आपापल्या भाषेत सर्व शिक्षण घेता येते, इतर भाषिकांची गावे व शहरे आपल्यात ओढून घेण्याविषयी स्पर्धा नाही व