पान:आमची संस्कृती.pdf/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / ११९१०. भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान भारत हा एक मोठा खंडप्राय देश आहेत्यांत निरनिराळे मानववंश राहतात. येथे निरनिराळ्या धर्माचे, चालीरीतचे व भाषांचे लोक आहेत. ह्या सर्वांचे मिळून एक राष्ट्र बनविण्याचा आपला प्रयत्न चालला आहे. बहुविधत्व किंवा विविधता हा भारतीय संस्कृतीचा एक विशेष आहे. ह्याबद्दल विस्ताराने कधीतरी विवेचन करता येईल. पण सध्या आपल्यापुढील मुख्य प्रश्न असा आहे की, सांस्कृतिक विविधता राष्ट्रीय ऐक्याला मारक होईल का? ही विविधता काही अंशी कायम ठेवून एकराष्ट्रीयत्वाची भावना रुजवता येईल का? की ही विविधता नाहीश करून एकजिनसी संस्कृती व एकराष्ट्र असेच समीकरण बरे? - ह्या व्यापक प्रश्नांच्या अनुषंगाने भाषेचा प्रश्न ह्या लेखात चर्चिला आहे.
 सांस्कृतिक विविधता एका दृष्टीने व्यक्तिस्वातंत्र्य व परस्परसहिष्णुता ह्यांची निदर्शक आहे. समाजजीवन संपूर्ण व्हावयास ह्या दोन्ही गुणांची आवश्यकता आहे. अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य समाजविघातकही ठरते.पण त्याचप्रमाणे सांस्कृतिक विविधतेच्या पोटात फुटीर वृत्तीचेही बीज असू शकते. म्हणून फुटीर वृत्तीला तर पायबंद असावा पण शक्य तितकी विविधता जीवनात असू द्यावी असे वाटते. निःश्रेयसाचे मार्ग अनेकआहेत. त्यांपैकी एकानेच फक्त स्वर्गात जाता येते व इतर सर्व मार्ग थेट