पान:आमची संस्कृती.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ५

जीवनक्रमात संस्कृतीची निर्मिती होणे अशक्य आहे. एकांतात राहिलेला रॉबिन्सन क्रुसो किंवा गिरीकंदरी वास करणारे ऋषिमुनी ह्यांचे जीवन संस्कृतिसंपन्न असते; पण ते समाजनिरपेक्ष नसते. मोठेपणी एकांतवासात राहिलेली ही माणसे लहानपणापासून सर्व सामाजिक संस्कार आत्मसात केलेली अशी असतात. अगदी लहानपणी रानावनात टाकलेली मुले एक तर मरून जातात किंवा जगलीच तर सर्वसाधारण मनुष्याचे व्यवहार करण्यास असमर्थ असतात.
 सामाजिक जीवन जरी संस्कृतीच्या निर्मितीला आवश्यक असले तरी पुरेसे नसते. नाहीतर कीटकांमध्येही संस्कृतीचा उगम झाला असता!
 आपल्याकडच्या पारमार्थिक वाङ्मयात व्यक्तीला परतपरत बजावून सांगतात की, 'तुझा मित्र-परिवार, हे कुटुंब, हे घर, हा मळा, हे द्रव्य व अलंकार सर्व येथेच सोडून तुला एक दिवस जावे लागेल! तू जन्मभर कष्ट करून ज्या ज्या गोष्टींचा संचय केला आहेस, त्या सर्व तुला येथेच टाकाव्या लागतील!' ह्या सर्व सांसारिक उपाधीतूनच संस्कृतीची निर्मिती होते. मनुष्य आपली सर्व भौतिक व मानसिक संपत्ती ठेवून जातो व ती पुढच्या पिढीला उपयोगी पडते. हेच संस्कृतीचे मुख्य बीज आहे. मानव इतर मानवापासून परंपरागत वस्तूंचा व मूल्यांचा वारसदार होऊ शकतो; म्हणून संस्कृती निर्माण होते; जतन होते व वाढीस लागते. फुलपाखराची आळी अगदी नव्याने आयुष्यास आरंभ करते; पण माणसाचे मूल संचयावर पोसते. त्याचा देह संचित द्रव्यावर पोसतो, तर त्याचे मन धर्म, रूढी, विज्ञान व मुख्य म्हणजे भाषा ह्या संचित मनोद्रव्यांवर पोसते.
 संस्कृतीची उत्पत्ती, जतन व संक्रमण भाषेच्याद्वारे होते. भाषा हे संस्कृतीचे एक प्रभावी अंग आहे. भाषेशिवाय संस्कृतीची निर्मितीही होणार नाही व संक्रमण तर सर्वस्वी अशक्य आहे.
 मूल अगदी लहान असल्यापासून त्याच्या कानांवर शब्द पडत असतात. त्या शब्दांचे उच्चार शिकण्याआधीच त्याला त्यांचा अर्थ कळ लागतो. ते जसजसे वाढू लागते तसतसे शब्दांच्या उच्चाराबरोबर शब्दार्थांचे ज्ञान होऊ लागते व प्रत्यक्ष अनुभवलेल्या सृष्टीपेक्षा कितीतरी मोठी सृष्टी शब्दांच्याद्वारे हस्तगत होते. ध्वनी व शब्द बोलभाषेला आहेत,