पान:आमची संस्कृती.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / १०९

आणण्यापेक्षा झाला हा प्रकार योग्य झाला असेच म्हणावे लागेल.
 सध्याच्या महायुद्धात युरोपातील इतके तरुण मारले गेले आहेत की, अठरा ते तीसच्या जवान पुरुषांची राष्ट्राला कित्येक वर्षे वाण भासेल. त्या वयाच्या स्त्रिया मात्र होत्या तेवढ्याच आहेत. अशीच अवस्था गेल्या युद्धानंतरही झाली होती. ह्या सर्व प्रदेशात सक्तीचे एकपत्नित्व असल्यामुळे लाखो स्त्रियांना वैवाहिक जीवन मिळणे अशक्य झाले. कुवार राहणे किंवा पुरुषाशी लग्नबाह्य संबंध ठेवणे एवढेच त्यांना शक्य होते. देशात ज्यांची संसाराची इच्छा अतृप्त राहिली आहे व त्यामुळे ज्यांना मानसिक विकृती झाल्या आहेत अशा स्त्रियांची संख्या वाढली व दुसरीकडून विवाहसंस्थेचेच उच्चाटण होण्याची वेळ आली. कारण ब-याच मिळवत्या बायकांनी विवाहबाह्य संबंध करून मुले होणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे व कुमारी मातांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रात मानाचे स्थान असावे अशी चळवळ सुरू केली, व तशा त-हेचे कायदे करण्याच्या चळवळीही सुरू झाल्या. ह्या युद्धापूर्वी बर्लिन शहरात दरवर्षी होणारी औरस संतती अनौरस संततीपेक्षा कमी होती. (रशियात एखाद्या बाईला मूल झाले तर ते ज्या पुरुषापासून झाले असेल त्याच्याकडून त्या मुलाप्रीत्यर्थ पोटगी। मिळते) म्हणजे कागदावर एकपत्नित्वाचा कायदा असूनही आचारात तो नाहीसा होण्याची वेळ आली आहे.
 सुमारे दोन हजार वर्षे एकपत्नित्वाचा कायदा ख्रिस्ती लोकांत अस्तित्वात आहे. ह्या कायद्यामुळे तेथील स्त्रिया इतर देशांतील स्त्रियांपेक्षा जास्त सुखात व सुस्थितीत आहेत, तेथील कौटुंबिक जीवन जास्त सुखी व उच्च दर्जाचे आहे, असे म्हणण्यास काही आधार दिसत नाही. दरवर्षी संख्येने वाढत जाणारे घटस्फोट व विभक्तीकरण व मृतवत झालेल्या विवाहसंस्थेच्या व कुटुंबसंस्थेच्या पुनरुज्जीवनार्थ काय उपाययोजना करावी यावर समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संभार पहिला म्हणजे वरील विधानाची सत्यता पटेल. अर्थात सध्याच्या अनवस्थेचे खापर एकपत्नित्वाच्या रूढीवरच फोडण्याची माझी इच्छा नाही. पण ह्या रूढीमुळे विवाहसंस्थेचे व कुटुंबसंस्थेचे पावित्र्य वाढेल ही कल्पना सर्वथैव भ्रममूलक आहे.
 एकपत्नित्वाच्या कायद्यामुळे जर कोणाचे अतिशय नुकसान होणार