पान:आमची संस्कृती.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१०६ / आमची संस्कृती

अन्यायाचे असल्यामुळेच सर्वथैव त्याज्य आहे. दुसरे कलम कायदेकारांनी स्वत:च घातलेल्या सापिण्ड्याच्या व्याख्येला अतिव्याप्तिदोषामुळे बाधक आहे. ही दोन्ही कलमे केवळ परंपरागत रूढीला भिऊन घातली आहेत, असे दिसते. ज्यांचे गोत्र एक असते अशा एका पोटजातीतील कुटुंबांचा रक्ताचा संबंध वीस पिढ्यांतसुद्धा नाही असे पुष्कळ वेळा दिसून येते. कधी असलाच तर तो हजार वर्षांपूर्वी असला तर कोण जाणे. अशी स्थिती असता व सगोत्रीयांचा विवाह दिवसेंदिवस जास्त प्रमाणात होत असता ह्या मरू घातलेल्या रूढीला कारणाविना जिवंत करून योग्य वधू-वरांच्या लग्नात एक निष्कारण अडथळा नवीन कायद्याने निर्माण केला आहे. जेथे सगोत्रीयांचा रक्तसंबंध नसतो असे सिद्ध करता येते तेथे प्रवरांची तर गोष्टच बोलावयास नको. एक सापिण्ड्याचे बंधन पुरेसे आहे व तेही हिंदुस्थानच्या काही विभागात पाळीत नाहीत, हे आते-मामे भावंडांच्या विवाहाच्या रूढीबद्दल सांगताना वर दाखविलेच आहे.
 बरे, ही जी वैकल्पिक कलमे दिली आहेत त्यांनाही लागलीच परत विकल्प सुचवून दोन हिंदूचे लग्न एरवी जर कायदेशीर असेल तर ते केवळ दोन वर्णाचे आहेत, किंवा एकाच वर्णाचे सगोत्रीय आहेत, ह्या मुद्यावर बेकायदेशीर होऊ नये अशी तरतूद केली आहे. म्हणजे समितीच्या मनात आहे तरी काय हेच समजत नाही?
 हिंदुस्थानात प्रचलित असलेल्या निरनिराळ्या पद्धती, उदाहरणार्थविज्ञानेश्वराची, दायभागाची, वगैरेंचा विचार करून त्यांतील पुढारलेल्या व प्रगतिशील विभागांचे एकत्रीकरण करून सर्व हिंदूंना लागू पडेल असा एकच कायदा करण्याची समितीची प्रतिज्ञा काही बाबतींत सफळ होण शक्य नाही, काही बाबतीत एकच कायदा सर्वांना लावण्याच्या अट्टाहासान पुष्कळ जमातींवर अन्याय होण्याचा संभव आहे, व सर्वांना आवडेल असा कायदा करण्याच्या भरात तो प्रगमनशील होत नाही हे वरती सोदाहरण दाखविलेच आहे. आता ह्या कायद्यांत सुचविलेल्या कलमांची क्रमाने चर्चा करू.
 हिंदूच्या लग्नाबद्दल जी कलमे आहे त्यांतील काहींचे विवेचन पूर्व केलेच आहे. आता राहिलेले एक कलम म्हणजे विवाहेच्छु वधुवराना पहिल्या विवाहाचा पति किंवा पत्नी असता कामा नये हे होय. या