पान:आमची संस्कृती.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४ / आमची संस्कृती

बीजगुण मुंगीच्या अपत्यांत येतात व ते पूर्णतया ठरलेले असतात. तसेच फुलपाखराची मादी अमक्या पानावर अंडी का घालते हे सर्व जीवनक्रम पाहून मागून आपल्याला कळते. ती पाने त्या फुलपाखराच्या जातीचे खाद्य असते. आळ्या बाहेर आल्या की, लगेच खाद्य पुढे ठेवलेले असावे अशी योजना ह्यांत असते. पण ही योजना मादीने समजून केलेली नसते. अशा माद्यांच्या हजारो पिढ्यांनी हेच केलेले असते. तो बीजगुणच आहे. घातलेल्या अंड्यांपैकी शेकडा नव्वद नष्ट होतात व शेकडा दहा टिकतात. ह्या प्राण्यांचे सर्व प्रारंभ ठराविक व फल देणारे असतात. कोकिळा दरवर्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. कावळ्यांना अजून ह्या प्रतिष्ठित चोरापासून आपले घरटे व आपली अंडी कशी सांभाळावीत हे उमजले नाही व कोकिळा अजून स्वत:चे घरटे बांधण्यास शिकली नाही. एक कावळा जे करतो तेच इतर करतात; मुंग्या तसेच वारूळ परत परत बांधतात; मधमाशा आपले पारदर्शक षट्कोन हजारो वर्षे बांधीत आल्या आहेत. कोणी घराचा आकार, रंग व द्रव्य बदलीत नाहीत. ह्या एका ठशातील जीवनाला संस्कारमय जीवन' म्हणता यावयाचे नाही. ह्यांत नवनिर्मिती नाही, संचय नाही व शिक्षणाच्या रूपाने खालच्या पिढीला संक्रमणही नाही. जीवनक्रमाची रचना गुंतागुंतीची असली तरी अचल, ध्रुव आहे- कायम ठशाची आहे.

 सामाजिक जीवनाचे महत्त्व
 मनुष्याचा जीवनेतिहास गेल्या सहा लाख वर्षांचा माहीत आहे. सहा लाख वर्षांपूर्वीचा माणूस आजचे समाजजीवन जगेल हे कोणास शक्य वाटले असते का? आजचा मानवी समाज शंभर वर्षांनी कसा दिसेल हे कोणास तरी नक्की सांगता येईल का? खचित नाही. जीवनात जी नवनिर्मिती होत असते ती मानव स्वत: करतो, तिचा सांभाळ करतो, ती नव्या पिढीपर्यंत पोचवतो. अशाच जीवनाला संस्कारमय जीवन म्हणता येईल. ते जीवन कशामुळे निर्माण होईल ते पाहू या.
 मनुष्याचे असे कोणते गुणधर्म आहेत की ज्यामुळे संस्कृतीची निर्मिती शक्य होते?
 संस्कृती ही समाजाची निर्मिती आहे. एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या