पान:आमची संस्कृती.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०२ / आमची संस्कृती

होत नाही, तसे एकाने स्वच्छ राहून आरोग्य वाढत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छता पाळली पाहिजे. सर्वांची मालमत्ता ही कोणाचीच नव्हे अशी वृत्ती ठेवून चालणार नाही. रस्त्यावर लावलेली झाडे सर्वांच्या मालकीची, त्यांना पाणी घातले नाही तर निदान खच्ची तरी करू नये; शाळा, चावडी, वसतिगृहे सर्वांची; ती झाडली नाहीत तर निदान थुकून, रेघोट्या ओढून, मोडतोड करून त्यांची नासधूस करू नये. चालण्याचा रस्ता सर्वांचा, निदान आपल्याबरोबर इतरही त्या रस्त्याने जात येत आहेत, त्यांची पण सोय पाहावी एवढ्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा आज आपणाला कळेनाशा झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या क्षुद्र क्षणिक गरजेसाठी पुढील पिढ्यांची आपण किती कुचंबणा करतो हे रस्त्यावरील छायेची झाडे चोरून तोडणा-याला, शाळा कॉलेजातील पुस्तकांतील पाने फाडून नेणा-यांना, जेथे कळत नाही तेथे स्त्रियांची बेअदबी होईल असे वर्तन करू नये, थोडक्या भांडणासाठी तट पाडून सबंध गाव बिघडवू नये हे कसे कळणार?
 जेथे जेथे सरकारने असे करावे असे आपण म्हणतो तेव्हा, माझ्या हातून अमके झाले पाहिजे हे विसरतो. सरकारने आटोकाट प्रयत्न केले तरी प्रत्येक व्यक्तीने निष्ठेने त्यास हातभार लावला पाहिजे. समता व सुसंस्कृत जीवन निर्माण होण्यासाठी संपत्तीची निर्मिती, योग्य वाटप व सर्वांनी मिळून जतन आवश्यक आहे. तसेच कितीही संपत्ती निर्माण केली तरी प्रजा जर अविरतपणे वाढतच राहिली तर अपुरीच पडणार. सार्वजनिक स्वच्छता व औषधोपचार ह्यांनी मृत्यूला बंध घातला आहे. पाटबंधारे, सडका, रेल्वे वगैरेंनी उत्पादन व ने-आण सुलभ झाल्याने दुष्काळ नावाच्या मृत्यूला शह दिला आहे. अशा वेळी जननालाही बंध पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व कुटुंबाने आपल्याला किती मुले झेपतात व कितीच भरण-पोषण नीट त-हेने होईल हा विचार करूनच कुटुंबाचा विस्तार केला पाहिजे व अशा त-हेने नव्या समाजाच्या रचनेला मदत केली पाहिजे.
- १९५४