पान:आमची संस्कृती.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १०१

येण्यासारखीसुद्धा स्थिती नसली म्हणजे वाईट वाटते व विषमतेविरुद्ध संताप येतो. वरील समाजांतून गरिबाला शिक्षण वगैरे मिळून वर येण्यास संधी मिळते म्हणजे आजचा गरीब उद्याचा श्रीमंत होतो व दर पिढीस नव्याने परिश्रम न केल्यास कालचा श्रीमंत आज कंगाल होतो. अशा त-हेची समाजव्यवस्था होणे आपल्या समाजात अत्यावश्यक आहे. त्याशिवाय समाजात एकोपा, प्रयत्नशीलता व शांती नांदणार नाही. अशी व्यवस्था राजकीय सत्तेने केली पाहिजे, एकट्या, दुकट्या समाजसेवकाचे हे काम नव्हे. ती करताना परस्परद्वेषाचा फैलाव होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. पण आपली सध्याची स्थिती विषमतेच्या इतक्या पराकोटीला गेली आहे की, वर सांगितलेल्या प्रकारांनी सामाजिक समता स्थापण्याचे प्रयत्न निकडीने झाले पाहिजेत. तसे झाले नाही तर सामाजिक व राजकीय क्रांती ह्यांच्या आगीत किती जीवांचा बळी पडेल ते सांगवत नाही. माझा पिंड स्त्रीचा आहे. सृजन, संगोपन व संवर्धन ही भाषा मला कळते व पटते. पण क्रांतीच्या नावाखाली चाललेला बेफाट प्रचार आणि संहारक मार्गाचा उपदेश मला पटत नाही, संहारातून जीवनाची मूल्ये निष्पन्न होतील असे वाटत नाही. सामाजिक पुनर्रचना समतेच्या पायावर तातडीने न झाल्यास मात्र तेच आपल्या नशिबी आहे हे निश्चित.
 समाज व व्यक्ती
 समाजाच्या घटकांचे परस्परावलंबन कसे असते हे पाहून आता व्यक्ती व समाज ह्यांचे परस्परसंबंध कसे असावे हे थोडक्यात सांगते. आपल्या समाजात ज्याप्रमाणे निरनिराळे घटक एकमेकांविषयी बेफिकीर आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीही आपल्याला अगदी साधीसुधी तरी सामाजिक कर्तव्ये आहेत हे विसरून गेली आहे. स्वत: अगदी स्वच्छ राहिले, आपले घर झाडून लोटून साफ ठेवले व मग घरातील सर्व घाण रस्त्याच्या कोप-यात टाकली किंवा म्युनिसिपालिटीच्या डब्यात नीट न टाकता लांब उभे राहून, एक हात नाकाला लावून भिरकावून दिली. तर त्या स्वच्छतेचे काहीही फळ मिळणार नाही. ह्या घाणीत वावरणाच्या माशा, डांस सर्व रोग घेऊन तुमच्या घरात पायाच्या धुळीबरोबर किंवा वाच्याबरोबर येणारच. तेव्हा फक्त एकाने श्रीमंत असून जशी समाजधारणा