पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्म हा आचार मानला तर त्यांच्या मुळाशी विचाराची प्रेरणा, प्रार्थना, प्रक्रिया असावी लागते. आचारधर्माचे निर्धारण, संवर्धन हे विचारातून होते.
 प्रार्थना दुर्बलतेतून निर्माण होणारी सबलतेच्या आकांक्षेची कृती उत्सुक साधना होय. तिला साधना म्हणण्यापेक्षा इच्छा म्हणणे अधिक सयुक्तिक व्हावे.साधनेत एक प्रकारचे कर्मकांड, नियमितता, सातत्य अपेक्षित असते.
 प्रार्थना अंतर्मन संवाद असल्याने विचार, चिंतन, मनन यापलीकडे कोणताच कर्म उपचार अभिप्रेत नाही. कोणताही कर्मोपचार कर्मकांडच मानायला हवा. प्रार्थनेस वेळेच्या निश्चिततेची गरज नसते. प्रार्थना विशिष्ट मन:स्थितीची प्रतिविक्षिप्त क्रिया असल्याने व मन:स्थितीची विशिष्ट वेळ, पूर्वकल्पना नसल्याने प्रार्थनेची विशिष्ट वेळ, पूर्वकल्पना नसल्याने प्रार्थनेची विशिष्ट वेळ निश्चित करणे म्हणजे तिला कर्मकांड बनवणे होय. आसन, उपचार, प्रतिमा पूजन, उदबत्त्या, धूप घालणे, ताल, चाल, संगीत, प्रकाश योजना हे सारे बाह्य उपचार होत. प्रार्थना एकांतात साधलेला मौन स्वसंवाद होय. बाह्योपचार अशा संवादास अनुकूल वातावरण निर्माण करतात, पण त्यांचा प्रभाव बाह्य असल्याने तो कृत्रिमच शिवाय प्रासंगिकही राहतो.
 सामुदायिक प्रार्थना हा सामुदायिक असाह्यता, दुर्बलतेचा सामुदायिक आविष्कार होय. आविष्कार हा अभिनयच. अनुभूती नि अभिव्यक्तीत जे अंतर असते तेच मन:स्थितीच्या प्रकटीकरणात, व्यक्तिगत प्रार्थना स्वत:साठी असू शकते. तशी समुदाय, समाज, देश, जग इत्यादीसाठीही. सामुदायिक प्रार्थना व्यक्तीसाठीही असू शकते.
 प्रकट प्रार्थना हे कर्मकांडच. तो विकास प्रक्रियेचा आवश्यक घटक कसा होऊ शकेल? झाला तरी परिणाम प्रासंगिक असेल. गोध्रातील दंगली शमल्या म्हणून सामुदायिक प्रार्थना केली तर गोध्रातील दंगल शमेलही पण परत जातीय दंगल उसळणार नाही याची शाश्वती देता येत नाही. उत्स्फूर्त प्रार्थनेतून परिवर्तन शक्य. मात्र तो अंतर्मनाचा उद्गार हवा.
 स्फूर्तिगीते, सामुदायिक प्रेरणागीते ही प्रार्थनेचीच भावंडे होत. ती वातावरण निर्माण करू शकतील, परिवर्तन नाही. त्यांचा उद्देश वातावरण निर्मिती हाच असतो.

 त्यांच्या सातत्यातून मनोभूमिका निर्माण होण्यास साहाय्य होते खरे, पण तो बाह्योपचारच असतो, हे विसरून चालायचे नाही. म्हणून परिवर्तनोत्सुक सारे प्रयत्न अंतर्मन घडणीवर केंद्रित हवे.

आकाश संवाद/९६