पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनाथांचा अंत्योदय

 महारथी कर्ण हा पौरुषाचे प्रतीक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. कर्ण हा कुंतीचा विवाहाआधी जन्मलेला मुलगा. अनौरस पुत्र म्हणून सर्वांनी त्याची हेटाळणी केली. जात, पात नसलेल्या या कर्णाला द्वंद्वयुद्ध खेळण्याचाही साधा अधिकार नव्हता. पण कर्ण मोठा हिमतीचा. “जन्मा येणे दैवा हाती, व्यर्थचि कुल थोरवी' म्हणत त्याने स्वसामर्थ्य व पुरुषार्थाच्या बळावर अंगदेशचा राजा होऊन दाखवलं. एक अनौरस मुलगा, त्याला योग्य संधी मिळाली आणि तो अनौरसाचा अंगराज झाला. आपल्या समाजात कर्णासारखी अनौरस बालके प्रत्यही जन्मत आहेत. अनाथ, निराधार बालकांना विकासाची सर्व ती संधी उपलब्ध व्हायला हवी. पण आजचे चित्र मात्र विदीर्ण करणारे आहे.
 समाजात अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था अनाथ, निराधारांना आश्रय देऊन त्यांचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न करताहेत. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे ‘‘पुष्कळशा कळ्या ह्या किडीच खाऊन जातात. या बालकांच्या भविष्याची स्थिती याहून वेगळी नाही. आज समाजाच्या दयेवर पोसणारं त्यांचे जीवन अधिक मुक्त व समृद्ध व्हायला हवे. “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे' म्हणत अनाथ, निराधारांबद्दल समाज निष्क्रिय राहिला, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या गावात आसपास असलेल्या अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्थांत आपण कधी डोकावले तर आहे का, असा मनाशी प्रश्न करा. उत्तर काय येईल. ब-याच सामाजिक प्रश्नात आपली भूमी ही बघ्याचीच राहिली आहे.

 हे सर्व चित्र बदलायला हवं. प्रत्येक चांगल्या बदलाची सुरुवात स्वत:पासून नको का करायला? गावकुसाबाहेरील वस्तीसारख्या अस्पृश्य राहिलेल्या अनाथाश्रमासारख्या संस्था आपल्या संवेदनांनी ओथंबल्या पाहिजेत. आपलं वर्तुळातलं छोटं सुखपूर्ण जीवन सोडून आपण दुस-याचे दु:ख अनुभवायला

आकाश संवाद/८७