पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोणताही सण आणि समारंभ हे आपल्यातील सामाजिक जाणीव समृद्ध करण्याचे साधन असते. रक्षाबंधनाच्या दिवशी अनाथाश्रमातील बालकांना राखी बांधायची आणि मग वर्षभर त्यांच्या व्यथा, वेदनांकडे ढुंकूनही पाहायचं नाही. आपल्या अशा आचरणाने आपण त्या सणाचा आशयच हरवून बसत असतो. उपवासासारखे व्रत खरे तर आपल्यातील शुद्धता, पावित्र्य यांचा विकास करण्याच्या हेतूने सुरू झाले. 'उप' म्हणजे जवळ आणि ‘वास' म्हणजे राहणे. परमेश्वराजवळ रहाणे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपण आपले मन व शरीर शुद्ध ठेवू. यासाठी मंदिर, मशीद नि प्रार्थनागृहात जाणे आवश्यक नसते. आपण जेथे जातो ते प्रसन्न वातावरणाचा मनावर अनुकूल परिणाम व्हावा व परिणामी आपले मन मांगल्याने भरून यावे म्हणून पण प्रत्यक्षात असे होते का? होत नसल्यास ते का होत नाही? याचा आपण शोध घ्यायला हवा. माणसाने सतत आत्मशोध घेत राहिले पाहिजे. आत्मशोधामुळे माणसात स्वत:चे, दोष, मर्यादा माहीत होतात. त्यांचे परिमार्जन करणे हाच उपवासाचा खरा हेतू असतो. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले सारे उपवास ‘आहार' केंद्रित केले आहेत, ते खरे तर ‘आचार' केंद्रित व्हायला हवे.

 आपण सर्व सणांना ऐश्वर्य प्रदर्शनाचे माध्यम म्हणून वापरू लागलो आहोत. ऐश्वर्य असणे नि त्याच्या उपभोगाची संधी मिळणे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत भाग्य नि भाकिताचा भाग आहे. पण खरं तर ती कष्टाची परिणती होय. पण त्याचे प्रदर्शन विवेकानेच व्हायला हवे. संत एकनाथांची कथा या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे. कुत्र्याने भाकरी पळवल्यावर त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन धावणा-या या संत प्रवृत्त महामानवाने आपत्तीतही परमार्थ शोधण्याची दिव्य दृष्टी आपणास दिली. सण असो की संकट, जीवनातील प्रत्येक क्षण हा परमार्थ कारणी लावायला आपण शिकलो पाहिजे. परमार्थात त्याग नि दानाच्या उदारतेबरोबर भोक्त्याच्या संतोषाचे सुख सामावलेले असते, हे लक्षात ठेवून आपण प्रत्येक सण हा दुर्बलांचे दैन्य दूर सारण्यासाठी मिळालेली एक मंगल संधी मानून तिचा उपयोग केला पाहिजे. आपण असे वागू लागलो तर अनेक सामाजिक समस्या समूळ उपटून टाकल्यासारखे होईल.

आकाश संवाद/८२