पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्णांच्या घरी भिक्षा करावी असे जे शास्त्र आहे ते साधकाने अनुसरावे. श्रीचक्रधर केवळ शिकवण देऊन थांबले नाहीत तर आपल्या आचरणाने त्यांनी हा नवा आचारधर्म अनुयायात दृढमूल केला. मातंगाच्या हातचा प्रसाद खाणे, हरिजनाघरी भोजन इत्यादी अनेक प्रसंग उदाहरण म्हणून सांगता येतील.
 महानुभाव संप्रदाय केवळ चातुर्वण्र्य विरोधी होता म्हणून तो एकात्मवादी होतो असे नाही. स्त्री संबंधी या पंथाने स्वीकारलेले धोरण सामाजिक, धार्मिक नि भावनात्मक एकात्मतेच्या संदर्भात ही एकात्मता नि समतेचा पुरस्कार करणारे होते असे दिसून येते. स्त्री रजःस्वला होते असे कारण पुढे करून तिला सर्व क्षेत्रांतून अस्पर्श ठेवण्याचा प्रघात महानुभाव पंथाने मोडला. पूर्वी स्त्रीस यज्ञादी धर्मकृत्यात अपात्र समजण्यात येत होते. संन्यास घेण्याचा तिला अधिकार नव्हता. तिला मोक्षही न मिळण्याची व्यवस्था धर्मकृत्यात होती. स्त्रीस समानता देऊन तिला मनुष्यत्व प्रदान करण्याचे क्रांतीकार्य महानुभाव पंथाने केले. स्त्रीस संन्यास घेण्याची या पंथाने मुभा दिली. हा पंथ बाह्य पावित्र्यापेक्षा अंतः पावित्र्यास महत्त्व देणारा असल्याने त्याने स्त्रीच्या अपावित्र्याची कल्पना झुगारून देऊन तिला समाजात धर्मकृत्यात मानाचे समानतेचे स्थान दिले व आपली एकात्म वृत्ती सिद्ध केली.
 महानुभाव पंथाने आपल्या तत्त्वज्ञानात ‘असती परी' शीर्षकांतर्गत वर्णिलेले अनेक नीति नियम म्हणजे धार्मिक, सामाजिक व भावनिक एकात्मता निर्मिण्याचे सोपानच. त्यागाची आवश्यकता, विषयसंबंध त्याज्य, अहंतेचा त्याग, कनिष्ठांशी प्रेमपूर्वक वर्तन, एकत्र स्थानपान, अहिंसा वृत्ती, इतरांना अभय देण्याचे आश्वासन, समता इ. आचार नियम करून या पंथाने आपल्या अनुयायांना सर्व समावेशक वृत्तीचा अंगीकार करण्याचाच जणू उपदेश केला आहे. महानुभाव पंथ हा एक धर्म पंथ असल्याने त्याने ईश्वर, जीवस्वरूप, प्रपंच, अवतार, क्रियापक, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादीचे विस्तृत विवेचन केले आहे. असे असले, तरी कुठेही त्याने आपली एकात्मवृत्ती सोडली नाही. त्याच्या या आगळ्या वैशिष्ट्यामुळेच तो अल्प काळात सर्वत्र प्रसारित झाला नि विरोधात टिकूनही राहिला.

 धर्म नि एकात्मता यांचा इतका जाणीवपूर्वक विचार करणारा धर्मपंथ आपणास अभावानेच सापडेल. तत्कालीन सर्व धर्म नि संप्रदाय आपला धर्म, आपले अनुयायी, आपली धर्मपीठे इत्यादीच्या संकीर्ण विचारात गुरफटलेले होते. या पाश्र्वभूमीवर या पंथाने स्वीकारलेली लोकाभिमुख वृत्ती निश्चितच क्रांतिकारी म्हणता येईल. हिंदू धर्मांतर्गत जे विभिन्न संप्रदाय त्या काळी प्रचलित होते त्यांची सहिष्णुता संदिग्ध होती. त्यांच्यात विश्वव्यापक वृत्तीचा

आकाश संवाद/७७