पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजरचना आतून बाहेरून पोखरून निघाल्यासारखी झाली होती. अनेक प्रकारची दैवते, व्रतवैकल्ये, मंत्र तंत्र इत्यादीचे साम्राज्य समाजात सर्वत्र पसरले होते. धर्माच्या नावावर अधर्म घडत होता. जनसामान्यांची धर्मावर असलेली श्रद्धा नष्टप्राय होण्याचा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत सामान्य जनतेस ख-या ईश्वर भक्तीचे, खच्या धर्माचे स्वरूप समजावून देणे आवश्यक झाले होते. हे ऐतिहासिक, कार्य महानुभाव पंथाने केले. खच्या भक्तिभावनेचे जनसामान्यांत बीजारोपण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या या पंथाचे स्वरूप प्रचलित सर्व संप्रदायांपेक्षा वेगळे होते हे ओघाने आलेच.
 तत्कालीन हिंदू धर्मात प्रचलित असलेले अधिकांश पंथ नि संप्रदाय चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे होते. जातीयता पाळणे हा शिष्टाचाराचा भाग समजण्यात येत होता. धर्मकार्यात स्त्रीस अपात्र मानण्यात येत होते. धर्मकृत्यात कर्मकाण्डास असाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. या नि अशा अनेक गोष्टींमुळे धर्माच्या नावावर माणसाचे मनुष्यत्व हिरावून घेण्यात आले होते. अशा समाजात महान अनुभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम महानुभाव पंथाने केले. समाजाची ही स्थिती पाहून या पंथाने आपला असा वेगळा आचारधर्म निर्माण केला. हा आचारधर्म म्हणजे धर्माद्वारे सामाजिक, धार्मिक, भावनिक एकात्मता निर्मिण्याचा महान यज्ञच होय.
 पंथसंस्थापक श्रीचक्रधरांनी महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानात आचारधर्मास असाधारण महत्त्व दिले आहे. आचारधर्मांतर्गत असणारे विविध नीती नियम पहाता हा पंथ केवळ धर्म संप्रदाय नसून तो एक समाज रचनेचा नवा विचार आहे हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. ‘समाज धारेय इति धर्मः' अशी धर्माची जी व्याख्या करण्यात येते त्याचे भान महानुभव पंथाने ठेवल्याचे पदोपदी जाणवते. ईश्वर, ईश्वर प्राप्तीचे मार्ग, मोक्ष, माया इत्यादी गूढ धर्मचिंतनात रममाण होण्यापेक्षा धर्माच्या सहज स्वरूपाचे निरूपण करणे या पंथाने श्रेयस्कर मानले. धर्म, जात, ईश्वर इत्यादी सर्व तत्त्वांना एकात्मतेच्या दृढ बंधनाने बांधून त्याद्वारे समतावादी मानवसमाज निर्मिण्याचा या पंथाने केलेला प्रयत्न अल्प असला, तरी आरंभाच्या दृष्टीने महत्त्वाचा खचितच मानावा लागेल.

 आचार धर्मांतर्गत या संप्रदायाने आपल्या सर्व अनुयायांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेत असलेली आपपर भेद वृत्ती विसरून सर्वाठायी समानता शोधण्याची दिलेली शिकवण या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. भिक्षुकाने कुणाच्या घरी भिक्षा मागावी या प्रश्नाचे निरूपण करताना श्रीचक्रधरांनी म्हटले आहे की, “चातुर्वर्ण्यचरदभैक्षमः या शास्त्रासि अनुसरिजे' याचा अर्थ असा की चारही

आकाश संवाद/७६