पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदी भाषेचा मराठी साहित्यावरील परिणाम

 संस्कृत ही भारतीय भाषांची जननी भाषा म्हणून सर्व परिचित आहे. तिची थोरवी गाताना पंडितांनी तिला 'देववाणी' म्हणून गौरविले आहे. अशा एका समृद्ध भाषेपासून हिंदी व मराठी या भाषा भगिनींचा जन्म झाला आहे. जुळ्या बहिणींमध्ये दिसून येणारे साम्य या दोन्ही भाषांत आपणास पहावयास मिळते. या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी आहे. दोन्ही भाषांत जवळ जवळ ४0% शब्द समान आहेत. दोन्ही भाषा व साहित्याचा विकास एकाच गतीने आणि समांतरपणे होत आला आहे. परस्पर समानतेच्या अशा किती तरी खुणा हिंदीमराठीत दिसून येतात. या दोन्ही भाषांतील समानतेमुळे आणि दृढ़ संबंधांमुळे मराठी भाषिकांनी हिंदी साहित्यात व हिंदी भाषिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. ही साहित्यिक देवाणघेवाण इसवी सनाच्या तेराव्या शतकात सुरू झाली. विशेष आनंदाची गोष्ट अशी की ही आदान प्रदान प्रक्रिया आजही तितक्याच उदारतेने व अखंडपणे सुरू आहे.
 जेव्हा कोणत्याही दोन भाषांत परस्पर संबंध निर्माण होतात तेव्हा एका भाषेचा परिणाम दुस-या भाषेवर होणे क्रमप्राप्त असते. हिंदी-मराठी भाषांच्या निकट संबंधांमुळे मराठी भाषेचा हिंदी साहित्यावर व हिंदी भाषेचा मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचे अभ्यासाअंती दिसून येते. मराठी साहित्यावरील हिंदी भाषेच्या परिणामाचा प्रारंभ संत नामदेवापासून सुरू झाला. आरंभी फक्त काव्य प्रांतापुरताच मर्यादित असलेला परिणाम साहित्य विकासाच्या रुंदावलेल्या कक्षेमुळे गद्यावरही झाला. परिणाम व प्रभावाची ही प्रक्रिया भाषा व साहित्याच्या गतिमानतेबरोबर आपोआप प्रगत होत राहात असते.

 इ. स. १३०० ते १७00 या काळातील हिंदी मराठी साहित्य हे प्रामुख्याने भक्तिपर साहित्य म्हणून ओळखले जाते. या काळात मराठीत नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ या संत कवींनी अभंग, पदे, गौळणी, श्लोक

आकाश संवाद/६७