पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बाल गुन्हेगारी तसेच बाल गुन्हेगारांच्या बाबतीत गंभीरपणे विचार करण्याची ही क्रिया एकोणिसाव्या शतकापासून सुरू झाली. युरोपियन देशात या सामाजिक समस्येबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जागृती झाली. या संदर्भात इंग्लंडमध्ये खूप प्रगती झाली. ब्रिटिशांकरवीच आपल्या देशात त्या वेळी बाल गुन्हेगारांच्या चिकित्सेला सुरुवात झाली. सन १८५0 मध्ये या संदर्भात भारतवर्षात पहिला कायदा पास झाला. बांगला, मुंबई, मद्राससारख्या तत्कालीन प्रदेशातसुद्धा असे प्रादेशिक कायदे अमलात आणले गेले होते. आज बालगुन्हेगारी, अनाथ, निराधार मुलांची सुरक्षा आणि पालनपोषण ही राष्ट्रीय जबाबदारी मानली गेली आहे. या संदर्भात सन १९८६ मध्ये ‘बाल न्याय अधिनियम' कायदा राष्ट्रीय पातळीवर अमलात आणला गेला आहे. या कायद्याची स्थापना तसेच अंमलामुळे या अगोदरचे सर्व प्रादेशिक कायदे रद्द केले गेले आहेत. बाल न्याय अधिनियमामुळे बाल गुन्हेगारी तसेच त्यांचे संरक्षण व विकासाच्या एका उदार नीतीची सुरुवात झाली आहे. पाहू या, भविष्यात ही नीती कुठपर्यंत सफल होते?
 समाजात जेव्हा मुलांना गुन्हा करताना पाहिले जाते, तेव्हा पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेतात. कायदेशीर विचारपूस केल्यानंतर त्यांना निरीक्षण गृहात ठेवले जाते. हे सर्व करत असताना आज मुलांशी पोलिस आणि न्याय व्यवस्थेची वागणूक इतर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे असत नाही, ते त्यांच्याशी त्यांच्या हितचिंतकाप्रमाणे वागतात. निरीक्षण गृहातील अधिकारी तसेच कर्मचारीसुद्धा त्यांच्याशी आपलेपणाने वागून त्यांच्यात आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढवतात. न्यायाधीश त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करतात, निरीक्षण गृह, बालगृहासारख्या संस्थात.
 एक काळ असा होता की या संस्था म्हणजे तुरुंगाच्या काळ्या कोठड्याच होत्या. मुलांना प्रौढ गुन्हेगारांबरोबर ठेवलं जात होते. निरीक्षण संस्थांमध्ये त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या यंत्रणेतून जावे लागे. पण आज स्थितीत खूप परिवर्तन झाले आहे. या सर्व संस्था आता संस्काराच्या शाळाच झाल्या आहेत. या सर्व संस्था 'घरे' बनविली जात आहेत.

 बाल गुन्हेगारांच्या अनेक समस्या आहेत. मुले जन्मतः गुन्हेगार असत नाहीत. परिस्थितीमुळे त्यांना गुन्हेगार बनणे भाग पडते. मुले गुन्हेगार बनण्याची अनेक कारणे आहेत. अधिकांश मुले वाईट संगतीचे बळी असतात. आई, वडिलांचे अतिशय प्रेम तसेच आंधळा विश्वाससुद्धा त्यांना गुन्हेगार बनवित असतो. कधी कधी काळे धंदे करणारे त्यांच्या निष्पापतेचा गैरफायदा घेत असलेले दिसून येतात. दारिद्रय, गरिबी, अज्ञानासारखी तत्त्वेसुद्धा त्यांना या

आकाश संवाद/६४