पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रभाषा आहे. त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याच्या तसेच त्यांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने आम्ही हिंदीला एक वेगळेच स्थान दिलेले आहे. आमची अशी धारणा आहे की राजभाषा हळूहळू मजबूत होईल. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच कच्छपासून कोलकात्यापर्यंतचे सर्व जण भाषा भाषी हिंदीचा वापर करायला लागले तर आपोआप ती राष्ट्रभाषा बनेल. आपले सरकार या संदर्भात हळूहळू का असेना, प्रयत्न करत आहे. आज बँका, विमा कंपन्या, पोस्ट, मंत्रालय, राजदूतावासासारख्या सर्व शासकीय क्षेत्रांत तसेच कार्यालयात राजभाषा हिंदीचं महत्त्व वाढत आहे. राजभाषेचा वापर अधिक व्हावा म्हणून सरकारने अनेक उपाय केले आहेत. सर्व प्रपत्र, विवरणपत्र, प्रतिवेदना हिंदीतच आणले आहेत. सरकारने आता हिच्या व्यापक प्रसारासाठी प्रसार माध्यमांद्वारे लोकप्रचार अभियान हातात घेतले पाहिजे.
 ही आनंदाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे की स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७० वर्षांत हिंदी आमच्या देशाची ‘आंतरभारती' भाषा बनली आहे. आज आसामी, उडिया, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम, तमिळ, पंजाबी, काश्मीरी या सगळ्या भाषांमध्ये विचार आणि साहित्याची जी देवाणघेवाण होते ही हिंदीद्वारेच. मल्याळी न येणारा काश्मिरी आणि पंजाबी न येणारा बंगाली नागरिक त्या अपरिचित भाषेच्या साहित्याला हिंदीच्या माध्यमानेच जाणतो. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, केंद्रीय हिंदी निदेशालयासारख्या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने आज भारतीय भाषेतील अभिजात साहित्याने हिंदीत रूपांतर झालेले आहे. अनेक प्रकारचे कोश, संदर्भ ग्रंथ, पारिभाषिक शब्द, ज्ञान-विज्ञानाचे मौलिक ग्रंथ आज हिंदीत उपलब्ध आहेत. सर्वसाधारण माणूससुद्धा आज इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय देश-विदेशाची सर्व माहिती जनभाषा हिंदीद्वारे प्राप्त करू शकतो. शासकीय पत्रव्यवहार हिंदीतून होऊ लागला आहे. सगळ्या बातम्या, जाहिराती, राष्ट्रीय प्रसारण हिंदीतूनच होऊ लागले आहे. शिक्षणाच्या सगळ्या पातळ्यांवर हिंदीचा अभ्यास, शिक्षण तसेच संशोधन सुरू आहे. हिंदीतील टंकलेखन यंत्र, संगणक, टेलेक्ससारख्या सुविधा आज उपलब्ध आहेत. दूरदर्शनने तर मुलांपासून म्हाता-यांपर्यंत हिंदी शिकवायचे काम केले आहे. एवढ्या सर्व प्रयत्नांनंतरही आमच्या देशात एका राष्ट्रीय अभिमान व कर्तव्याच्या भावनेने ज्या प्रमाणात हिंदीचा वापर अपेक्षित होता तो अजूनही होत नाही.

 तसे पाहिले तर हिंदी आज केवळ भारताची भाषा राहिलेली नाही. तिचं स्वरूप आज विश्वभाषेचे बनले आहे. जगात सगळ्यात जास्त प्रचलित आणि बोलणान्यांची संख्या या दोन्ही निष्कर्षांवर हिंदी जगाची तिसरी भाषा आहे.

आकाश संवाद/६०