पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. त्या वेळी बालविवाहाची प्रथा होती. पुन्हा पुन्हा पसरणाच्या सांसर्गिक आजारांमुळे आपल्या माता-भगिनी तरुणावस्थेतच विधवा बनत होत्या. त्या वेळी विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहाचा प्रश्नच नव्हता. अशा स्त्रियांना केशवपनाच्या प्रथेला बळी पडावे लागत होते. तारुण्यसुलभ कामवासनेच्या प्रलोभनाला बळी पडून अनेक अविवाहित व विधवा स्त्रिया गर्भवती बनत होत्या. समाजाच्या उपेक्षेच्या भीतीने गर्भपातासाठी शक्य ते प्रयत्न केले जात होते. नवजात शिशूची निघृण हत्या बघून महात्मा फुल्यांच्या काळजात कळ उठत होती. त्यांनी या अनौरस आणि अनाथ, नवजात बालकांच्या हत्येला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने सन १८३६ मध्ये ‘बाल हत्या प्रतिबंधक गृह’ उघडले. या संस्थेत त्यांना आश्रय दिला जाऊ लागला. मग त्यांना झालेल्या अनाथ आणि अनौरस मुलांच्या पालनपोषणाची समस्या उभी राहिली. महात्मा फुले यांनी अशा अनाथ मुलांना दत्तक घेण्याच्या कार्याला सुरुवात केली. लोकांना या समस्येबद्दल जागृत करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतः विधवा बाईच्या एका मुलाला दत्तक घेतलं. महात्मा फुले यांच्या साच्या समाजसुधारणा उपक्रमांची ही विशेषता होती की कोणत्याही गोष्टीला ते विचार, व्याख्यान आणि लेखनाच्या सीमेपर्यंतच पाहात नव्हते. प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी ते भावनिक एकात्मतेच्या पुढे जाऊन व्यक्तिगत स्तरावर त्यासाठी कृतिशील होत होते. स्त्री शिक्षणाचा प्रारंभ त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित करून केला. तीच गोष्ट अनाथ मुलांना सनाथ करण्याची.
 केशवपन प्रथेचा विरोध करण्यासाठी त्यांनी नाभिक लोकांना एकत्रित करून त्यांना संपही करावयास लावला. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी संगठन आणि संघर्षाच्या सर्व साधनांचा वापर केला. विधवा स्त्रियांची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी १८६५ मध्ये पुनर्विवाहाचे आयोजन करून लोकांमध्ये त्यांच्याविषयी आस्था निर्माण केली.
 स्त्री दास्यतेबरोबराच ते दलितांच्या विभिन्न समस्येविषयी नेहमी सतर्क राहात. दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी हजारो मैल चालत जावे लागे. ते प्रत्येक समस्येच्या समाधानाची सुरुवात स्वतः सोडवूनच करीत. फुल्यांनी आपल्या घरचा हौद दलितांना खुला केला. आज महाराष्ट्रात जो 'एक गाव, एक पाणवठा' उपक्रम चालू आहे, त्याचं बीज महात्मा फुल्यांच्या या उपक्रमातून दिसून येतं. एकोणिसाव्या शतकात शिवाशिवीचे नियम कडक होते. अशा वेळी त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एक अपूर्व, अनोखे असे धाडस होतं.

 महात्मा फुले स्वतः समाज सुधारणेच्या विविध कार्यात व्यस्त राहात होते. अशा कार्यात व्यस्त राहणाच्या इतर समाजसुधारकांच्या विषयी ते नेहमी

आकाश संवाद/५६