पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजचं जीवन केवळ रौद्र झालेय. हे सारे नरकासुर भस्मासुर नि रक्तबीजासारखे अजेय असल्याचे समाजभय वाढत आहे. हे वाढते समाजभय मित्रांनो! कुणी देवदूत येऊन दूर करणार नाही. नरकासुराच्या हत्येसाठी कृष्णजन्माची वाट पहात आपण आयुष्य काढत राहिलो तर नरकासुराने आपणास कधी गिळले ते समजणारसुद्धा नाही. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आवतीभोवतीचे नरकासुर गाडून टाकण्यात घालवायला हवे. सामाजिक स्वास्थ्यासाठी आता हे अटळ आणि अनिवार्य आहे.
 एक काळ असा होता की भारत हा सरस्वतीचा प्रदेश मानला जायचा. ऋषी मुनींच्या जप तपाची सुदीर्घ परंपरा हे या देशाचं वैभव होते. या देशात लक्ष्मी व सरस्वती एकत्र नि त्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाले तर गुण्यागोविंदाने नांदत होत्या. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अपवादात्मक घरातच दौत आणि वही लेखनाची पूजा पहायला मिळते. लक्ष्मी उपासक, धनलोभी झालेल्या समाजास सरस्वतीचे झालेले विस्मरण अधिक चिंतादायक झाले आहे. कधी काळी पुस्तकांनी भरलेल्या अलमाच्या आता चैनीच्या वस्तूची प्रदर्शने झालीत. भौतिक सुखाच्या मागे धावणारे आपण सारे, भविष्यात जेव्हा एकाकी होतो तेव्हा चंचल लक्ष्मीने आपली साथ सोडलेली असते. सरस्वतीचा वरदहस्त व वास्तव्य नसलेलं घर स्मशानापेक्षा भयावह असतं, हे। आपण समजून घ्यायला हवं. 'आश्विन आमावस्या' आपणास 'तमसो मा ज्योतिर्मय'चा संदेश देते. तो आपण कधी समजूनच घेतला नाही. सोनेरी, रुपेरी प्रकाशात आपले डोळे इतके दिपून गेलेत की शाश्वत सुखाचा शोध आपण विसरूनच गेलो आहोत. लक्ष्मीपूजनादिवशी सरस्वती पूजनाचा रिवाज पुन्हा सुरू व्हायला हवा.

 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' म्हणून आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. अनारोग्य, दु:ख दूर व्हावे आणि लोककल्याणकारी राज्य यावे म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस. सुराज्याच्या नववर्षाच्या प्रारंभाची आकांक्षा बाळगणारा हा दिवस. प्रत्यक्षात स्वातंत्र्याच्या गेल्या पन्नास वर्षांत दानी, परोपकारी, प्रजाहितदक्ष बळीराजा आपणास लाभलाच नाही. मित्रांनो! स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांच्या विभिन्न प्रयोगानंतर आता मात्र आपण जागे व्हायला हवं! राज्यकर्त्यांना दुषण देऊन आपणास हात झटकता येणार नाहीत. देश उभारणीच्या यज्ञात प्रत्येक नागरिकाच्या विवेकशील समिधा जोवर पडणार नाहीत तोवर बळीराजाचे राज्य येणे अवघड. नैराश्य आणते इडा पीडा, उत्साह आणतो विवेकाचे राज्य.

आकाश संवाद/४३