त्यांच्या कथा प्रवासाची दिशा असते. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' अशा सहजतेने त्यांच्या कथांची रचना असते. साने गुरुजी श्रेष्ठ दर्जाचे कथाकथन करायचे, लोककथाही लिहायचे. गुरुजींचं कथालेखन कथाकथन (Stpru telling) शैलीचे असते. त्यामुळे त्या वाचक व श्रोत्यांशी सहज नाते जुळवू शकतात. अशी प्रचंड ताकद घेऊन आलेल्या त्यांच्या कथात्मक साहित्याची सारी शक्ती आणि क्षमता ही त्यांच्या आशयात सामावलेली असते. साने गुरुजींच्या कथात्मक साहित्याची मोहिनी पिढ्यानपिढ्यात राहते, याचे कारण त्यांच्या विचार व आचारात असलेली सुसंगती होय. आधी केले नि मग सांगितले.' असं त्यांचे सारे जीवन असल्याने ते कथांमध्ये अकृत्रिमरित्या उतरलेले दिसते.
साने गुरुजी कथाकार म्हणून श्रेष्ठ ठरतात ते केवळ वाङ्मयीन निकषांवर, त्यांनी यशस्वी कथा, कादंब-या लिहिल्या म्हणून नव्हे. त्यांचे श्रेष्ठत्व हे पिढी दर पिढी वाढत गेलेले दिसते. त्यांच्या कथा साहित्यानी केवळ वाचकांना प्रभावित केले नाही. त्यांनी लेखक घडवले. साने गुरुजींच्या नंतरच्या पिढ्यांनी गुरुजींच्या कथादर्शाचा वसा जपला. ते लेखकांना प्रभावित करणारे लेखक होते. अणू विघटन शक्तीप्रमाणे त्यांच्या लेखनातील आशय पुढील पिढ्यांत द्विगुणित होत राहिला आहे. आजच्या स्वार्थी जगातही लोक मानवता जपू, जोपासू इच्छितात. याचे सारे श्रेय साने गुरुजींच्या मानवतावादी कथारचनांनाच द्यावे लागेल.
जे आहे ते वर्णन करणे म्हणजे वास्तवाचे चित्रण होय. त्यासाठी निरीक्षण आवश्यक असते. जसे असावे असे वाटते ते चित्रित करणे आदर्श चित्रण होय. त्यासाठी प्रज्ञा, कल्पना व चिंतनशीलता आवश्यक असते. गुरुजींच्या कथा लेखनात हे दोन्ही गुण दिसतात. ह्या अर्थाने त्यांचे कथात्मक साहित्य हे आदर्शोन्मुखी वास्तव साहित्य होय. हा जीवनाचा भावानुवाद होय. काही लोकांनी भाबडेपणा म्हणून त्याची टोपी उडवली तरी त्या लेखनाचे जीवनमूल्य कधी कमी झाले नाही. गांधीजींची हेटाळणी का कमी झाली? अक्षर साहित्य हे नेहमी काळाच्या कसोटीवर खरे उतरत असते म्हणतात. सात दशकांचा दीर्घकाळ लोटला तरी लोकांना ते वाचावे, विचार करावे असे वाटते यातच त्याचे कालजयीपण सिद्ध होते. गांधीवादावर गुरुजींची श्रद्धा होती. त्याचे प्रतिबिंब गुरुजींच्या साहित्यातील अहिंसा, हळवेपणा, प्रेम, करुणादी गुणात