पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विनविते. कुणी आपल्या वाटेवर काटे भले पसरो. आपण फुले पसरावित सारखा क्षमाशीलतेचा संस्कार देणारी ही कथा माणुसकीचा गहिवर अधिक गडद करते. ‘चित्रा आणि चारू' या कथेतही असंच. या कथेतला गुंडही माणूस म्हणून पुढे येतो. 'सती' कथेच्या प्रस्तावनेत साने गुरुजी स्पष्ट कबुलीच देतात की, “मला खलनायकाची कल्पनाच करता येत नाही. असा टोकाचा ध्येयवाद संत प्रवृत्तीचे कथाकार साने गुरुजीच जपू शकतात. आपण सारे भाऊ' मधील ‘कृष्णनाथ' म्हणजे साने गुरुजींमधील अव्यक्त साहसी पुरुषाचे उदात्तीकरण होय. गुरुजींनी आपल्या कथातून जीवनाच्या कट्रतेस नेहमीच फाटा दिला. जीवन कसे आहे यापेक्षा ते कसे असावे यावर त्यांचा अधिक भर असायचा. त्यांच्या कथा मानवी सहिष्णुतेच्या संवर्धनार्थ समर्पित अशा रचना होत.
 साने गुरुजींच्या कथा आणि कादंब-यांचा एकत्रित अभ्यास केला की त्यातील अद्वैत स्पष्ट होते. या कथात्मक साहित्यामागे नवा भारत, समाजशील भारत उभा करायचे स्वप्न होते. देश घडणीचं एक आदर्श आणि आशादायी चित्र अथवा स्वप्न त्यांच्यापुढे असायचे. त्यांच्या कथात्मक साहित्यावर प्राचीन संतांचा निरूपणासारखा शैलीगत प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. गुरुजींमधील कथाकार हा बहुश्रुत होता. गुरुजींनी देश-विदेशी साहित्य वाचले होते. भारतातील विविध भाषांतील साहित्याची त्यांना जाण होती. तमिळ, बंगाली साहित्य त्यांनी अभ्यासले होते. तिरुवल्लूवराच्या ‘कुरल'चा त्यांनी केलेला अनुवाद वाचला की हे लक्षात येते. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीतून जन्मतं. ते प्रयत्नसाध्य लेखन नसते. न राहून ते लिहिले जाते. मग त्या साहित्यात मातीचा गंध आपसूकच येतो. साने गुरुजींच्या समग्र कथासाहित्यात अलंकार, म्हणी, उखाणे, वाक्यप्रचार, श्लोक, अभंग, ओव्या येतात. कारण ते समाजशील कथाकार होते. लोकांच्यात कथा रुजायच्या तर ह्या त्यांच्या जीवन परंपरेतून यायला हव्या असं भान असलेले कथाकार म्हणून साने गुरुजींकडे पहावं लागेल. त्यांच्या कथात तोच तोपणा असतो. पण त्यांचे संदर्भ प्रत्येकवेळी वेगळे असतात, उद्देशही वेगळा असतो. त्यांनीच स्पष्ट केल्याप्रमाणे ‘झाडाला येणारी पालवी असते ती. तीच पण नवी.

 साने गुरुजींच्या समग्र जीवन व लेखनाचे सार ‘मेणाहून मऊ व दगडाहून कठोर' असं दुहेरी असते. त्यांच्या कथात बुडति हे जन पहावे ना डोळा' आशयाची धडपड असते. समस्त मनुष्यजातीचा सर्वोदयाची तळमळ त्यांच्या कथात्मक साहित्यात जागोजागी दिसते. सत्याचा शोध व जीवन विवेचन ही

आकाश संवाद/३७