पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवास एकत्र नांदवून दाखवतील' अशा आशेने लिहिलेली कादंबरी. यात आर्य व नागांच्या ऐक्याद्वारे गुरुजी भारतीय एकात्मताच सूचित करतात. साने गुरुजींनी ‘आस्तिक'मध्ये कथा रूपकाचं मानवीकरण केले आहे. ही कादंबरी गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात लिहिली. तत्कालीन जातीय दंग्यांचा संदर्भ ‘आस्तिक'च्या रचनेमागे आहे. वि. स. खांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे ही कथानकप्रधान कादंबरी नसून तत्त्वप्रधान कथा आहे. या शिवाय गुरुजींनी ‘दीनबंधू'सारख्या अनेक कादंब-या लिहिल्या. या सर्व कथाकृतीत मनुष्य जीवन अधिक सुंदर, पवित्र व सत्यप्रिय व्हावे असा आशावाद स्पष्ट केला गेला आहे. या कादंब-यांनी मराठी साहित्याच्या भावसौंदर्यात मोलाची भर घातली आहे.

 साने गुरुजी जसे कादंबरीकार होते तसे सिद्धहस्त कथाकारही होते. ‘विश्राम’ ‘सोनसाखळी’ ‘मुलांसाठी फुले', अमोल गोष्टी, ‘सुंदर कथा', 'मोरी गाय’, ‘दु:खी’, ‘चित्रा नि चारू' हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. या शिवास त्यांनी दहा भागात गोड गोष्टी लिहिल्या. “आवडत्या गोष्टी'चे सहा भागही प्रसिद्ध आहेत. सुमारे ३० कथासंग्रह लिहून साने गुरुजींनी मराठी बालवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. यापैकी ‘विश्राम' अशा चार गोष्टी आहेत. या साच्या बोधकथा होत. ‘मोलकरीण' शिक्षित पिढीस आई-वडिलांविषयी ऋणाईताची भावना शिकविते. 'शशी'मध्ये गुरुजी बालशिक्षणाच्या कृत्रिमतेवर प्रहार करतात. 'विश्राम' कथेवर समाजवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या साच्या कथांत तंत्रापेक्षा मंत्राकडे लेखकाचे अधिक लक्ष आहे. भरलेले हृदय रिकामे होईपर्यंत लिहिण्याचे झपाटलेपण प्रतिबिंबित करणा-या या कथा आहेत. अत्यंत सोप्या भाषेत उत्कट माणुसकीची शिकवण देणाच्या या कथांचे आपले असे महत्त्व आहे. सहजता व साधेपणा हा गुरुजींच्या कथा लेखनाचा मोठा गुण. 'सोनसाखळीची गोष्ट' ज्यांनी वाचली वा ऐकली असेल त्यांना याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. सोनसाखळी गोड स्वभावाची मुलगी होती. सावत्र आई तिचा खूप छळ करायची. बाबा मात्र खूप प्रेम करायचे. ते एकदा परगावी गेले असता सावत्र आई छळ करून मारून टाकते. तिचे तुकडे करून जमिनीत पुरते. कळू नये म्हणून पुरलेल्या जागेवर डाळिंबाचे झाड लावते. बाबांची सोनसाखळीशी परतभेट होतच नाही. काही दिवसांनी झाडाला एक सुंदर डाळिंब लागते. बाबा ते तोडून कापू लागतात तोच आतून आवाज येतो. हळू कापा. मी आत आहे.' सोनसाखळी आपली सारी शोककथा बाबांना सांगते. बाबा चिडून आईस मारू लागतात तर ती क्षमा करा म्हणून

आकाश संवाद/३६