पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘तीर्थोटली' होय. बेचाळीस भागात तिची रचना आहे. म्हटले तर बेचाळीस कथात्मक प्रसंगांचा हा संग्रह. आपणाद्वारे (स्वत:द्वारे) परबोधाची तळमळ या कादंबरीत आहेत. यातील प्रत्येक प्रसंग वाचकास माणुसकीच्या दिव्यत्वाकडे घेऊन जातो. पायाला माती लागू नये म्हणून जपतोस ना, तसाच मनालाही घाण लागू नये म्हणून जप' असे सांगणारी ही कादंबरी बालवयातच पावित्र्य रुजविताना दिसते. कुटुंब, नाती, सदाचार, आदर्श अशा कितीतरी पैलूंचे चित्रण करणारी ‘श्यामची आई' (साच्या महाराष्ट्राची आई होताना दिसते. या कादंबरीने) सर्वांनी श्यामप्रमाणे सुधारावे. गोरगरीब, दलित पीडित जनतेची सेवा करावी म्हणून मानवी समाजाच्या उत्कर्षाची दिलेली शिकवण म्हणजे माणूस मोठा करणारी धडपड होय.
 तीन खंडांत लिहिलेल्या 'श्याम' या रचनेत कथा आणि चरित्राचा सुंदर मिलाफ आढळतो. ही तीन कथात्मक पुस्तके म्हणजे बाल्य, किशोर व तारुण्य अवस्थेतून जाणा-या पिढीची जीवन मार्गदर्शिकाच होय. यातील पहिला खंड जीवन घडणीचा आहे. दुसरा जीवन कलहाचा, धडपडीचा तर तिसरा जीवन विकासाचा. साने गुरुजींच्या कथात्मक कृतीमागे पिढी घडविण्याच्या ध्यासाचे विस्मरण झाले, असे कधी होत नाही. किंबहुना, मनुष्य घडणीची तळमळ या साच्या लेखनाचे उगमस्थानच होय. या त्रिखंडात्मक आत्मपर कादंब-यांतून येणारा ‘श्याम' हा कादंबरीचा केवळ नायक राहात नाही. तो उगवत्या पिढीचा प्रेरक आदर्श बनतो. ‘उद्याचे माणुसकीचे जग गहिवराने भरलेले पहायचे असेल तर त्याची रुजवण आजच व्हायला हवी' असा द्रष्टा विचार साने गुरुजींच्या या रचनेमागे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

 रचनेच्या घाटाने ज्यांना कादंबरी अथवा कादंबरिका म्हणता येतील अशा पंधरा रचना साने गुरुजींनी लिहिल्या. ‘धडपडणारी मुले' ही दोन भागात लिहिलेली कादंबरी. आज महाराष्ट्रात प्रा. ग. प्र. प्रधान, बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. बाबा आढाव प्रभृती समाजसेवकांची घडण या साहित्य कथाकृतीनी केली. ‘आस्तिक' ही त्यांची पौराणिक कथानकावर आधारलेली कादंबरी. केवळ पौराणिक कथानक उगाळायचे म्हणून ही कादंबरी खचितच त्यांनी लिहिली नाही. आपल्या या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी मानवी जीवनाविषयीची आस्तिकताच स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, 'मनुष्यातील सत्प्रवृत्तींवर विश्वास ठेवून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करावयास जे झटतात तेच खरे आस्तिक. या विचारातून मानवी जीवन सत्प्रवृत्त करण्याची गुरुजींची धडपड स्पष्ट होते. ‘प्रिय भारत देश सर्व धर्मांच्या व संस्कृतींच्या

आकाश संवाद/३५