पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणुसकीचा गहिवर : साने गुरुजी

 साने गुरुजी समग्र लेखक होते. कथा, कादंबरी, चरित्रे, निबंध, कविता, पत्रे अशा सर्व प्रकारचे त्यांनी लेखन केले. अनुवाद, संपादन क्षेत्रातील त्यांचे लेखन लक्षणीय आहे. सुमारे ११५ ग्रंथांचे ते लेखक होते. पण त्यांचा मूळ पिंड कथाकाराचाच दिसून येतो. साने गुरुजी वृत्तीने देशप्रेमी होते, व्यवसायाने शिक्षक होते, पण आचार नि विचारांच्या पातळीवर त्यांचे जीवन सतत माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेले असायचे. ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।' म्हणणा-या या कवी/कथाकाराच्या साच्या लेखनाचे अधिष्ठान माणुसकी हेच होते. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, नैतिकता इत्यादी जीवनमूल्यांवर साने गुरुजींची अपार श्रद्धा होती. मूल्यांचा झपाट्याने व्हास होणा-या आजच्या काळात गुरुजींचे साहित्य म्हणजे अंधाच्या गाभा-यात शांत तेवणारा नंदादीपच. त्यांचे सारे साहित्य आपणास संस्कारगर्भ दिसून येते.
 साने गुरुजींनी विपुल कथात्मक साहित्य लिहिले. इंग्रजीत ज्याला सामान्यपणे ‘फिक्शन' संबोधले जाते अशा कथा, कादंबरी, आत्मकथा प्रकारचे साहित्य लिहिण्यात गुरुजींचा हातखंडा होता. कथा निरूपणाची गुरुजींची शैली संस्कार रुजवू पहाणाच्या संवेदनशील शिक्षकासारखी उपदेशात्मक असायची. १९३० ते १९५० या दोन दशकात त्यांनी प्रामुख्याने लेखन केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणांना त्यांनी आपल्या भाषणांनी देश स्वातंत्र्यासाठी पेटवून उठवले! त्याच गुरुजींच्या लेखणीने स्वातंत्र्योत्तर भारताची पहिली पिढी ध्येयवादी व आदर्श बनवली.

 'श्यामची आई' ही साने गुरुजींची आत्मकथनपर कादंबरी. ही कादंबरी सांस्कारिक अर्थाने अनेक पिढ्यांची आई झाली. असे श्रेष्ठत्व फारच कमी साहित्यकृतींना लाभते. गुरुजींच्याच शब्दात सांगायचे तर ही रचना म्हणजे

आकाश संवाद/३४