पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती जबाबदारी उचलतात. गावात भाषण, गाणे काही असले की जोडी पहिल्या रांगेत आसनस्थ असते. आजींची पूर्वी लांबसडक वेणी होती. त्या पाचवारी नेसायच्या. आज त्या चक्क चुडीदार घालतात. बॉयकट केलाय त्यांनी. आजोबा टी शर्ट, ट्राऊझर, कधी बर्मुडासुद्धा घालतात. मला त्यांची मुले, सुनाच वृद्ध वाटतात. संध्याछायेचा असा 'वसंतोत्सव' माझ्या मनात हेवा निर्माण करतो. आपणही संध्याछायेचं असे स्वागत करायला शिकले पाहिजे.
 संध्याछाया छोट्या करणे आपल्या हातात आहे. वृद्धावस्थेचे आशंकित भय मनातून टाकले पाहिजे. इंग्रजीत संध्याछायेचं मार्मिक वर्णन करणारे एक छोटे वाक्य आहे. त्यात म्हटलेय, "Fear is the dark room, where only negatives are developed." भीती अशा अंधारी खोली आहे की तिथे छायेचाच विकास होतो. अशा अंधार कोठडीतून आपण स्वत:स मुक्त ठेवले पाहिजे. हिंदी कवि दिनकर म्हणतात की, ‘बुढापे की आँखो में प्रकाश और मुट्ठी में आकाश होता है।' एका लेखकास एकंदी नव्वदीतला एक जगप्रवासी भेटला होता. तो गेली चाळीस वर्षं पायास टकळी लावून फिरत होता. लेखकांनी त्याला विचारले की मलातर ऐशीतच अंधूक दिसू लागलेय. तुला अंधूक दिसू लागले तर? तो प्रवासी म्हणाला, जोवर मी फिरत राहीन मला दिसतच राहणार. फिरण्याने तुमची दृष्टी विकसित होत राहते. टाळ कुटत घरी-दारी बसणारी माणसे नि तो प्रवासी, या प्रवाशापासून ‘कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' सारख्या कवीवचनांचा अर्थ मला साधार समजतो. संध्याछायेत अशी किती तरी प्रकाश किरणे नवे प्रदेश दाखवात. 'विश्व आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष' न्यायाने आपण सुकाळाचा, विश्वदेशाचा शोध घेत रहायला हवा.

 संध्याछायेचे जीवन म्हणजे असतो अनुभव, शहाणपण, कौशल्याचा अमृतकुंभ! तो केवळ हृदयाशी कवटाळून ठेवून काय उपयोग? आपल्या अनुभव संचिताचा उपयोग समाजास व्हायला हवा. आज संध्याछायेतील तांडे, थवे मी सकाळ-संध्याकाळ न्याहाळत असतो. वय झाले म्हणून त्यांना वृद्ध म्हणायचे, अन्यथा असतात धडधाकट. मी कधीतरी त्यांच्या गप्पा वळचणीत बसून ऐकतो तेव्हा त्यांच्या मनाची ‘हिरवाई’ माझ्या लक्षात येते. रोजच्या वर्तमानपत्रातील एखाद्या घटनेवरचे त्यांचं चर्वितचर्वण, त्यातील त्यांचा अभिनिवेश तरुणांना लाजवणारा असतो. हास्यक्लब, योगवर्ग, अभ्यास सभा, अशातील त्यांची अनुपस्थिती मला नेहमी काळजीत टाकणारी वाटत असते. त्या ऐवजी ‘वृद्धावस्था म्हणजे शहाणपणाचा अधिकोष' मानून आपले शहाणपण विधायकरित्या वृद्धिंगत करणे, ते समाजोपयोगी बनवणे आपण जर अंगी

आकाश संवाद/२२