पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनावर निराशेचे मळभ धरू लागते. उलटपक्षी ‘हत्ती गेला नि शेपूटच राहिलेय' असा आशावाद मनी बाळगायला हवा. मग हत्तीचे बळ येते आणि अशक्य ते शक्य होऊन जाते. 'रिकामे मन भुताचे घर' असते खरे! पण संध्याछायेत आपण आपलं मन जर सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवले तर पहा वेळ कसा जातो, ते कळणार सुद्धा नाही. वाचन, घरकाम, बागकाम, नातवांचे करणे, भाषण ऐकणे, छोट्या मोठ्या सामाजिक कामात, संस्थेत गुंतून राहण्याने ‘सार्थक्याचं सुख' संध्याछायेस पळवून लावते.
 काळ बदलाचे किती फायदे असतात म्हणून सांगू? पूर्वी घरी वडिलांना बाबा, आप्पा, नाना, काका म्हटलं जायचे. काही घरात एका वडिलांना ‘साहेब' म्हटल्याचंही मी ऐकलेय. आता अहो बाबाचा 'ए डॅड' झालाय! त्यामुळे वयातले, नात्यातले अंतर कमी होऊन मित्रत्व निर्माण होऊ पाहतेय! त्यामुळे अकारण असलेले पोक्तपण हळूहळू गळू लागलेय. तीच गोष्ट कपड्यांची. कपडे आता सर्वांचे सारखे होऊ लागलेत. बाजारात मी जातो तेव्हा पाहतो ‘सब साइज' कपडे आलेले पाहतो. विकणारा सहज म्हणत असतो ‘बाप भी पहने और बेटा भी!' पूर्वी आपण अकारण छोट्या छोट्या गोष्टीतून प्रौढपण जपायचो. आता वय विसरून केल्या जाणा-या मैत्री संबंधामुळे मानसिक संध्याछाया जवळपास फिरकतही नाही. धाकटी पाती’ नि “थोरली पाती' असा भेद आता उरला नाही.
 संध्याछायेची पारंपरिक लक्षणेही काळाच्या ओघात बदलली आहेत. पूर्वी चाळिशीनंतर केस पिकायचे. आता केस पिकण्याचा नि वयाचा संबंध राहिलाच नाही मुळी. अधिकांश लोकांचे केस आता ऐन तिशीतच पिकू लागलेत. माझे एक मित्र आहेत त्यांचा मेंदी विकायचा पूर्वापार धंदा आहे. ते सांगतात पूर्वी मेंदी सणावारास विकली जायची. आता घरोघरी महिन्याच्या सामानाच्या यादीत डाय, मेंदी, शांपू या वस्तूंना अढळपद मिळून गेलंय. एका घरात तर मी एकदा रविवारी घरातील सर्व जण एकमेकांस डाय, मेंदी लावतानाचे छान दृश्य पाहिलं. हे काय होते? माझ्या दृष्टीने संध्याछायेवर विजय मिळवण्याची ती नित्याची रंगीत तालीमच होती. पार्लर, हेअर ड्रेसर्समध्येही कितीतरी स्त्रिया, मुली, तरुण, वृद्ध केस काळे करून मन तरुण ठेवत असतात. 'मन चंगा तो कटौती में गंगा' असे हिंदीतले सुभाषित आता नित्याचं होऊन बसलंय.

 माझ्या परिचयाचे एक वृद्ध जोडपे आहे. आजोबा एका उद्योगात होते. आजी शिक्षिका होत्या. दोघे आपापल्या नोकरीधंद्यातून निवृत्त झाले. त्या दोघांना रोज सकाळी मिळून पोहायला जाताना मी पाहतो. ते नऊला येऊन सकस आहार घेतात. एका शैक्षणिक संस्थेत जाऊन आपणास जमेल, झेपेल

आकाश संवाद/२१