पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्लॅनेटसारख्या वाहिन्या निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, पर्यटन, इतिहास, भूतदया इत्यादीचे प्रभावी संस्कार करतात. पूर्वी वृत्तवाहिन्यांचे संस्कार मूल्य होते. आजच्या परस्परांतील जीवघेण्या स्पर्धात वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी हे मूल्य गमावलं असं चित्र आहे. नाही म्हणायला आकाशवाणी, दूरदर्शनसारखी माध्यमं स्वायत्त झाली तरी विवेक व शुचिता सांभाळून आहेत. वाचन संस्कृती जोपासायचे, भाषाशुद्धी विवेक जागवायचे कार्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या प्रभावीपणे करू शकतात. संस्कार संजीवनीचे वरदान ठरण्याचे सामर्थ्य या सर्वात आहे. या शतकात त्या अंगांनी प्रसार माध्यमांचा विकास झाला तर हे शतक संस्काराच्या दृष्टीने गतिशील व प्रभावी ठरेल. यंत्रातील शक्तीची बरोबरी मनुष्य कधीच करू शकणार नाही. पण यंत्राचा विवेक वापर ही सर्वस्वी माणसाच्या अखत्यारीतील बाब आहे. म्हणून यंत्र, माध्यमे विकासाची साधने म्हणूनच विकसित व्हायला हवीत. एकविसाव्या शतकातील माणूस संस्कारसमृद्ध व्हायचा असेल तर समाजात विवेकाचा जागर होत राहिला पाहिले. असा जागरच संस्कार संजीवनीचे वरदान ठरू शकेल.

आकाश संवाद/१९