पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागतात. हेच असते संस्कार संजीवनीचे वरदान! या वयात शिक्षक, पालकांना मुलांचे मित्र होता आले पाहिजे.
 संस्कारांचा महत्त्वाचा संबंध असतो तो जीवनमूल्यांशी आणि जीवन आदर्शाशीही! संस्कार म्हणजे सद्गुणांचा विकास, परस्परांशी प्रेमाने वागावे. गरजवंतांची सेवा करावी. आपले वागणे सभ्य असावे. असं नुसते शिकवून या गोष्टी रुजत नसतात. ‘आधी केले नि मग सांगितले.' सारखी उपचार पद्धती. संस्कारांपेक्षा कृतिशील वस्तुपाठ हे अधिक उपयोगी ठरतात. आपल्या मुलांनी मोठ्यांच्या पाया पडावे असे आपणास वाटत असेल तर आपण घरातील व घरात येणाच्या थोरामोठ्यांच्या पाया स्वतः पडण्याचा रिवाज ठेवावा. मग मुले आपोआप त्याचे अनुकरण करतात. या ऊपर एखादा मुलगा पाया पडला नाही तर व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदर करण्याचा उदारपणाही आपल्या अंगी असायला हवा. जे पालक, शिक्षक व्यक्तिगत स्वातंत्र्याची बूज ठेवून प्रयत्न करतात त्यांची पाल्ये अधिक संस्कारशील, संस्कारसमृद्ध होतात. जीवनात असे कितीतरी सद्गुण आहेत की ते सांगण्यापेक्षा कृतीतून पाझरणे अधिक परिणामकारक ठरते, असा सार्वजनिक अनुभव आहे. सहकार्य, परोपकार, सहिष्णुता, सहानुभूती, नम्रता, कृतज्ञता, दातृत्व, क्षमाशीलता, संयम अशा अनेक गुणांबद्दल विस्ताराने सांगणे शक्य आहे. पण या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगल्यावाईटातील फरकाचा संस्कार देणे. काय चांगले याच्या कसोट्या एकदा का माणसास उमजल्या की मग तुमचे कार्य संपले. समज व जाणिवांचा विकास हा संस्कार संजीवनीच्या वरदानातूनच शक्य होतो.

 एकविसावे शतक हे संस्काराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. माणूस यांत्रिक होतो आहे. जीवनाच्या रोज वाढणाच्या गतीने स्वत:कडे पाहण्याची पण फुरसत काळाने ठेवलेली नाही. ज्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत ते भौतिक समृद्धीनी वेढलेले आहे. संस्काराची पारंपरिक साधने गतीने मागं पडत आहेत. मानवी संबंध क्षीण होत आहेत. दुसरीकडे यंत्रांची घेरेबंदी मजबूत होते आहे. ज्या काळात मनुष्य यंत्रमुक्त होता तेव्हा माणूस हेच संस्काराचे सबळ साधन होते. मधल्या काळात साहित्य, संस्कृती, चरित्रांनी प्रभावी संस्कार साधनांची भूमिका बजावली. आज संपर्क साधने ही संस्काराची सर्वाधिक संवेदनक्षम साधने म्हणून विकसित होत आहेत. साधने स्वत: म्हणून निषेधार्ह नाहीत आणि नसतात. आजची माध्यमे या साधनांचा जहरी प्रयोग करत आहेत. रोज अस्तित्वात येणा-या वाहिन्या लोकशिक्षणापेक्षा लोकरंजनासच अधिक वाहिलेल्या दिसतात. हिस्ट्री, डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी, अॅनिमल

आकाश संवाद/१८