Jump to content

पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपणास समाज शिकवतो. आयुष्यभराची अनुभवाची शिदोरी देणारा समाज हा माणसाच्या उत्तर आयुष्याचा मोठा भागीदार असतो.
 संस्कार अनेक प्रकारचे असतात. ते शारीरिक असतात तसेच भावनिकही असतात. वळणाचा संबंध शारीरिक संस्काराशी असतो. हस्ताक्षर चांगले होणे, शिस्त लागणे, कामाची पद्धत, व्यवहारातील रीतीभाती या साच्या शारीरिक संस्कारातून येतात. कुमार, किशोर वय हे वळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मानसिक संस्कार सर्वाधिक संवेदनक्षम असतात बरे का! वाचन, विचार, ज्ञान ही त्याची साधने असतात. अनुकरण हे केवळ शारीरिक असत नाही, ते मानसिकही असते. मानसिक संस्काराचा प्रारंभ कळत्या वयात सुरू होतो. आपण जसे प्रौढ, प्रगल्भ होऊ तसे मानसिक संस्कार प्रौढ होतात. जीवनमूल्ये, आदर्श जीवनाचे ध्येय हे सारे विकसित होते ते मानसिक संस्कारातून. मित्रांनो, भावनिक संस्कार मोठे तरल असतात! प्रेम, प्रणय, सहवास, संपर्क, संवादातून भावनिक संस्कारांची जडणघडण अधिक प्रभावीपणे होते. ज्याला चांगले मित्र, मैत्रिणी मिळतात त्याचे भावविश्व अधिक निखळ होते. मानसिक व भावनिक संस्कारांच्या सीमारेषा तशा पुसट असतात. मानसिक संस्कारांचा संबंध बुद्धीशी असतो तर भावनिक संस्काराचा हृदयाशी. शारीरिक जडणघडण करणारे आई-वडील, शिक्षक निवडण्याचं स्वातंत्र्य आपणास नसते. ते एका अर्थाने लादलेले असतात. पण मित्र मात्र लाभत असतात. ते आपण निवडतो. कळत्या वयात चांगले-वाईट याचे पारख प्रथम नसते. माणूस ठेचा खातो, पण ठेचातून शिकतात ते शहाणे होतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीत दडलेला शहाणपणाचा संस्कार जो समजून घेतो त्याचे जीवन यशस्वी होतं. आयुष्याच्या या वळणावर चांगले मित्र मिळणं एक वरदान ठरतं.

 माणसावर होणारे संस्कार बाह्य असतात. संस्कारास मिळणाच्या आंतरिक प्रतिसादावर जीवनाची सफलता अवलंबून असते. ब-याचदा आपण असे पाहतो की एकाच घरातील, एकाच वातावरणात वाढलेली दोन मुले भिन्न प्रवृत्तीची, प्रकृतीची आणि स्वभावाची असतात. माणसाच्या घडणीत शारीरिक आंतरक्रियांचे महत्त्व आपण समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील शारीरिक आंतरक्रिया मोठ्या गुंतागुंतीच्या असतात. जे पालक, शिक्षक या वयात मुलांना समजून घेतात, त्यांच्यात अनुकूल बदल घडविण्याची क्रिया सुलभ होते. मुलांचे चोच्यामाच्या करणे, मुलींनी प्रेम करणे अशा नाजूक प्रसंगी जे पालक, शिक्षक संवादाची कुंकर घालू शकतात, त्यांच्याच हाती मुले

आकाश संवाद/१७