पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेल तर आपणास भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक एकता निर्माण केली पाहिजे. म्हणून त्यांनी त्या काळात दोन संस्थांची स्थापना केली होती. एक साहित्य अकादमी आणि दुसरी संस्था आजही भारतातील उत्कृष्ट साहित्य भाषांतरिल करून ते सर्व भारतीय भाषांमधून उपलब्ध करून देतात. विशेषतः साहित्य अकादमी प्रतिवर्षी भारतीय राज्यघटनेने राजभाषा म्हणून मान्य केलेल्या २२ भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविते. तेव्हा त्या २२ भाषांतील पुरस्कृत प्रत्येक साहित्य कृतींचा २२ भाषात अनुवाद करून घेऊन ते प्रकाशित करते. त्यामुळे स्थापनेपासून मुख्य भाषांना सरासरी ५० पुरस्कार गृहित धरले तरी किती रचना होतात पहा. दुर्दैव असे आहे की व्यासंगाने आपण त्यांचे वाचन व अभ्यास करत नाही.

प्रश्न - अनुवादित साहित्याच्या बाबतीत लोकांच्या पुढे अनुवादाचं योग्य स्वरूप आणि तेही तात्काळ मिळण्यासाठी म्हणून आपण जे नवीन तंत्रज्ञान शिकतो आहोत त्या नवीन तंत्रज्ञानामध्ये उदाहरणार्थ 'गुगल'सारख्या सर्च इंजिनवर सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या अनुवाद सुविधा उपलब्ध आहेत. पण तो अनुवाद वाचकांना भावतोच असे नाही. या परिस्थितीबद्दल आपण काय सांगाल?

उत्तर - या बाबतीत साहित्य अकादमीनी आणि नॅशनल बुक ट्रस्टनी एक काम केले आहे की त्यांची जी प्रकाशने आहेत ती आपल्या संकेत स्थळावर ईबुक अथवा पीडीएफच्या रूपात उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. ती आपण इंटरनेटवर वाचू शकतो, डाऊनलोड करून त्याची मुद्रित प्रत मिळवू शकतो. ही सर्व पुस्तके प्रमाण भाषेत आहेत नि त्यांची भाषांतरे प्रमाणित आहेत. आणखी एक काम अलीकडच्या काळात नॅशनल डिजिटल लायब्ररी (NDL) ने केले आहे. घटनामान्य २२ भाषातील उत्कृष्ट पुस्तके या ग्रंथालयाच्या संकेत स्थळावर वाचनासाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे २ लक्ष पुस्तके या घडीस वाचायला उपलब्ध आहेत. ही सर्व पुस्तके एकही पैसा खर्च न करता तुम्ही वाचू शकता, प्रत काढून घेऊ शकता. वाचन आता सोपे झाले आहे. पण वाचनाचा आळस वाढला आहे. वाचन दुर्मिळ नाही झाले. दोन लक्ष पुस्तके हाती येण्यात पुस्तकांची दुर्मिळता उरतेच कोठे? परत एकदा आपण वाचन संस्कृती विकासासाठी कंबर कसली पाहिजे. वाचन वेड, वाढावं

आकाश संवाद/१२५