पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न - सर, तुम्ही भारतीय भाषांचा अभ्यास केलाय, आकडेवारीच्या अंगाने काय सांगाल?

उत्तर - आपल्या देशात २९ राज्ये आहेत. ६ केंद्रशासित प्रदेश आहेत. या साधारणपणे ३५ घटक राज्य सदृश्य प्रांतांमधून अनेकविध भाषा, बोली बोलल्या जातात. सन २०११ च्या जनगणनेनुसार असे लक्षात आले आहे की सन १९६० पासूनच्या ५० वर्षात भाषा नि बोलींचा वापर न झाल्याने २१० भाषा लुप्त झाल्यात. भाषा व साहित्याचा विचार करताना हे लक्षात घ्यायला हवं की जी आपली भाषा अथवा बोली असेल तिच्या वापराबाबत आपण दक्ष राहायला हवे. आपली बोली कितीही छोटी असो ती आपण जपायला हवी. ती सतत बोलत राहिली पाहिजे. जगामध्ये फिरत असताना मला वर्तमानपत्रात कधीतरी अशा बातम्या नजरेस पडतात. मला आठवते की १९९६मध्ये मी जपानमध्ये होतो. तिथल्या वर्तमानपत्रात एक छोटी बातमी मला आढळली. बातमीत एका गृहस्थाचा फोटो होता नि लिहिले होते की अमुक बोली भाषेचा शेवटचा शिलेदार हरपला. त्याच्याबरोबर त्याची बोलीपण मेली. भाषा, बोली नि साहित्याचं अस्तित्व वापरावर टिकून असते. आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत कुसुमाग्रज, ‘स्वातंत्र्याची विनवणी' शीर्षकाची त्यांची एक कविता आहे. त्यात त्यांच्या दोन ओळी आहेत.

‘भाषा मरता, देशही मरतो.
संस्कृतीचा मग दिवा विझे'

प्रश्न - एवढे महत्त्व आपणास कुसुमाग्रजांच्या या ओळीतून दिसते. मला सांगा की भाषा व साहित्याचे जतन करण्यासाठी आपल्या देशाते कुठल्या स्तरावर नि कसे प्रयत्न सुरू आहेत?

उत्तर - सध्या भारतात या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचे श्रेय आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना द्यावे लागेल. जसं महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती जतनाचे श्रेय आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना जातं, तसेच भारतीय भाषा नि साहित्य संवर्धनाचं श्रेय नेहरूंकडे जातं. देश स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५०-५५ च्या दरम्यान त्यांनी असा विचार मांडला होता की आपणाला जर एकात्म भारत निर्माण करायचा

आकाश संवाद/१२४