पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतो. त्याकाळात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीचे असे एकही झेंडावंदन आठवत नाही की ज्यावेळी एखादी तरी मुलगी चक्कर येऊन पडली नाही. एन.सी.सी.च्या एक दोन मुली चक्कर येऊन पडायच्याच. तुम्ही जेव्हा मुलींच्या आरोग्याची तपासणी करायला लागाल तर तुम्हास मुलींमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी दिसेल, त्या अमिबिक आढळतील. मुलींच्या खाण्याकडे, त्यांच्या सकस आहाराकडे आपण लक्ष देणार नाही तोवर आपली ५0% पिढी कुपोषित (Malnourished) रहाणार आहे, हे केव्हातरी आपण मान्य करायला हवे. यासाठी प्राथमिक स्तरावरच लक्ष केंद्रित करायला हवे. आजही बालवाडी, प्राथमिक शाळातील मुला-मुलींचे डबे उघडून पहा, त्यात तुम्हास तफावत आढळल्याशिवाय राहणार नाही.

प्रश्न : तुम्ही या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आदर्श (Ideal) शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाच्या असल्याने चपखल बसू शकतात. पण चाळीस वर्षाच्या शिक्षणातील तुमचा अनुभव लक्षात घेतला तर पुढच्या पन्नास वर्षात या गोष्टी होऊ शकतील असे तुम्हाला वाटतं? तुम्ही आशावादीही आहात?

उत्तर : मी आशावादी नक्की आहे. त्याचं कारण असं की कोणतंही शासन असो वा समाज असो तो नेहमीच नव्याचा स्वीकार करत आला आहे. एक साधी गोष्ट आहे, आपल्या देशात सर्वत्र मातृभाषी वा प्रांतभाषी शाळांचं स्थित्यंतर (Switch overing), हस्तांतरण हे इंग्रजी माध्यमाकडे होते आहे. हा जागतिकीकरणाचा प्रभाव आहे, हे खरे आहे. प्रत्येकास असं वाटू लागलं आहे की माझ्या मुलास जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. यात काहीच गैर नाही. हे भारतीय समाज जागृतीचे फार मोठे व्यवच्छेदक लक्षण आहे. प्रश्न असा आहे की स्वप्न आणि सत्य यात अंतर राहिल्याने आपण केव्हातरी स्वप्नांना सत्याची वाट करून दिली पाहिजे.

समारोप : निश्चितपणे ही स्वप्नं सत्यात उतरतील, शिक्षणाचा दर्जा जागतिक होईल, जागतिक स्पर्धेला नव्हे तर जागतिक महत्त्वाकांक्षेने आपण आपले शिक्षण विकसित करू शकू हा जो आशावाद तुम्ही दाखवलात, खरोखर या पुढच्या काळात विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी म्हणून सर्वांनी सज्ज होण्याची गरज तुम्ही प्रतिपादली. आणि त्यादृष्टीने वाटचाल चालू आहे. नक्कीच याबाबत आपणास लवकरात लवकर यश येईल अशी आशा करूयात. आपण इथे आलात आणि आपले विचार व्यक्त केलेत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार!

आकाश संवाद/११९