पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारताने विद्यार्थ्याला लॅपटॉप द्यायचा? म्हणजे असं की दफ्तराच्या किंमतीत लॅपटॉप येतो हे किती जण जाणतात? केव्हा तरी आपण अभ्यास केला पाहिजे की दफ्तराच्या किंमतीत सिंप्युटर, टॅबस् घेणे शक्य आहे. मग अशी जर आपण नवी साधने दिली तर मग दफ्तरांच्या ओझ्याचे प्रश्न सुटतील. घरामधला विद्यार्थ्यांचा टॅब शाळेतल्या टॅब किंवा लॅपटॉपशी जोडणे शक्य आहे, पाटीवरचे ओझे वाचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटाइज एज्युकेशनचा प्रारंभ होईल. एकीकडे आपण ‘डिजिटल इंडिया'चे स्वप्न पाहतो, कॅशलेस व्यवहारांच्या गप्पा करतो, त्या गप्पांना ख-या अर्थाने केव्हा अर्थ येईल? मला असे वाटते की डिजिटाइज शिक्षणानेच ते शक्य होईल.

प्रश्न : डिजिटल शिक्षण घेत असताना किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना या मुलांना कला, संगीत, इतिहास, वाणिज्य हे सगळे विसरून जाणार का?

उत्तर - नाही, असं नाहीये. विद्यार्थी विद्यार्थी जसा मोठा होईल तसं त्याला विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. ते सर्वच देशांनी दिलेले आहे. प्रत्येक देशाच्या विकासाला कलाकार, तत्वज्ञ, संगीतकार, इतिहासकारांची गरज असतेच. आम्ही अलीकडे विज्ञानाची विभागणी Hard Sciences अणि Soft Sciences मध्ये करू लागलो आहोत. Physics ची जितकी गरज आहे तितकीच मानसशास्त्राचीही आहे. हे कोणीच नाकारणार नाही. पण कोणते विषय कोणत्या वयाला शिकवायचे याचे तारतम्य जगाने ठेवलेले आहे. इकॉनॉमिक्स महत्त्वाचे खरे. म्हणून ते इयत्ता ५ वीला नाही शिकवता येणार. ते तुम्हाला विद्यार्थ्यांची थोडी समज विकसित झाल्यावर इयत्ता ९वी, १० वीलाच शिकवले पाहिजे. मानसशास्त्रही आवश्यकच आहे पण ते पदवी स्तरावरच शिकवणे इष्ट. जगाने विषयांची काठिण्यपातळी (Difficulty Level) लक्षात घेऊन आपले अभ्यासक्रम तयार केले आहेत. तशा प्रकारचे अभ्यासक्रम आपण बनवायला हवेत. तसे अभ्यासक्रम मुलांच्या कलाने शिकवू लागलो तर हे शक्य आहे, पण भारतातल्या १% विद्यार्थ्यांची पण कल चाचणी (Aptitude Test) घेऊन त्यानुसार त्यांना शिकवले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत आपणाला मुलाचा कल कळणार नाही तोपर्यंत त्याच्या आवडीचं शिक्षण कसं नि केव्हा देणार? त्यामुळे केव्हा तरी प्राथमिक शाळांच्यामध्ये कलचाचणी अनिवार्य करायला हवी. प्राथमिक शाळात जसा शिक्षक अनिवार्य तसा समुपदेशक (Counsellor) अनिवार्य केला पाहिजे. प्राथमिक शाळांमध्ये आहारतज्ज्ञ (Dietician) नेमला पाहिजे. शिवाय मानसशास्त्रज्ञ नेमले पाहिजे. मी तीस-चाळीस एक वर्ष कॉलेजमध्ये, शाळेमध्ये

आकाश संवाद/११८