पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकत नाही, तो ते अत्यंत बेमालूमपणे करतात. माझ्या नातवंडांची जी पिढी आहे ती जे मॅसेजिंग करते - कट, फॉरवर्ड, पेस्ट ही जी नव्या तंत्रज्ञानाची जी कौशल्ये आहेत ती या पिढीत उपजत दहापट अधिक असल्याने या पिढीस आपण केव्हातरी कागदी शिक्षणाकडून (Printed Education) अंकीय शिक्षणाकडे (Digital/Vertual Edcuation) जर आपण १२-१२ वर्षे अभ्यासक्रम बदलत नसू, तर पिढी बरबाद करत असू तर शिक्षण नि काळ, काम, वेगाचा विचार व्हायला हवा. जगभर ज्या ज्या देशांमध्ये गुणवत्ता आहे, फिनलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, कॅनडा, जपानसारखे जे देश आहेत त्यांचा अभ्यास आणि अनुकरण केले पाहिजे. सिंगापूरसारखा देश घ्या. तिथे शिक्षकांसाठी ‘गोल्डन शेकहँड' सारखी योजना आहे. तेथील शासन प्रत्येक विद्याशाखेत (फॅकल्टी) पहिल्या दहा क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याचे आमंत्रण देतं. ते विद्याथ्र्याने स्वीकारले की प्रशिक्षण काळातच त्याला शिक्षकांच्या वेतनाच्या ६० टक्के इतकी घसघशीत शिष्यवृत्ती, विद्यावेतन मिळते. चार वर्षांचे त्याचे जे शिक्षण प्रशिक्षण आहे, ते इतके कठोर नि कठीण (Rigorous) आहे की तो जगातला आदर्श शिक्षक ठरतोच. आपल्याकडे डी.एड. आणि बी.एड.ला जी मुले प्रवेश घेऊ इच्छितात ती सुमार असतात. आता तर तीही प्रवेश घेऊ इच्छित नाहीत. कारण शिक्षकाची नोकरी मिळवायला १०-१५ लाख रूपये मोजावे लागत असतील तर कोण शिक्षक होणार? अशी एक नव्या शिक्षकाची नवी समस्या तयार झाली आहे.

प्रश्न : पण आता शासनाने शिक्षक निवडीची एकच परीक्षा घेऊन भरती करायचे ठरवले आहे ना?

उत्तर : हो, केंद्रीय निवड पद्धतीने आता शिक्षकांची निवड होणार आहे हे खरं आहे. पण शिक्षक निवडीचे अधिकार जोवर शिक्षण संस्था नि संस्था चालक यांच्याकडे राहणार तोवर गुणवत्ताप्रधान शिक्षक कसे नियुक्त होणार? जोवर टेबलाखाली व्यवहार होत राहाणार तोवर टेबलावर गुणवत्ता कशी दिसणार?

प्रश्न : सर, एकीकडे जसे तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञानाचा विचार केला तर मुले ही तंत्रज्ञान कौशल्ये स्वीकारण्यासंदर्भात खूप पुढे गेली आहेत नि त्यामानाने आपली शिक्षण पद्धती बरीच मागे आहे. मला एक सांगा की तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक गोष्ट अशी आपण म्हणतो की ही शिक्षक पिढी तयार होण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात काय बदल केले पाहिजे?

उत्तर : पहा ना, आज आपण दफ्तराच्या ओझ्याची चिंता करतो. का नाही

आकाश संवाद/११७