पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते लक्षात घेऊया. आज आपल्या आसपास जे सगळे जग आपण बघतो आहे ते जर आपण विद्याथ्र्यांच्या नजरेतून बघू लागलो तर असे दिसते की आपण जी प्रौढ पिढी आहो, ती प्रौढ पिढी विद्याथ्र्यांच्या भावविश्वाकडे त्यांच्या दृष्टीने पाहात नाही हे आपल्या शिक्षणाचे खरे शल्य आहे. त्यामुळे तुमच्या असे लक्षात येईल की वर्गात येणारी दरवर्षाची नवी पिढी ही अंकीय साक्षर (Digital Literate) आहे. म्हणजे उपजतच मुलांना ती वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक साधनांशी (Gadgets) खेळत असल्याने त्यांना व्हिडिओ गेम्स कसे खेळायचे, टी.व्ही. सुरू-बंद कसा करायचा, कॉम्प्युटर, मोबाईल ऑन-ऑफ कसा करायचा हे आपोआप कळते. त्याचा दिवसातील एकंदर कालखंड पाहिला तर तुमच्या असे लक्षात येईल की साधारणपणे सहा ते आठ तास ते या इलेक्ट्रॉनिक जगात असतात. त्यांचे खेळ, त्यांचा विचार, त्यांचे भावविश्व, त्यांची स्वप्ने सारे या जगाचे नि या जगातले असते. आजची सकाळचीच एक गोष्ट सांगतो. माझी नात मला सांगत होती, की ‘आजोबा, मी आज स्वप्नामध्ये इलेक्ट्रॉनिक गाडीने अवकाशात गेले. आता इलेक्ट्रॉनिक गाडीनी अवकाशात जाणारी पिढी, तिला जर आपण कोळशाच्या गाडीचे इंजिन शिकवायला लागलो तर आपण किती कालबाह्य शिकवतो, हे साध्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.

प्रश्न : लवटे सर, तुम्ही म्हणालात की आपली पिढी, आपल्या पूर्वीची पंतोजी पिढी, नंतर घरातल्या कत्र्या माणसांच्या धाकाखाली वाढलेली, शिकलेली पिढी आणि त्या पार्श्वभूमीवर मुलांचे भावविश्व जपण्याचा विषय तुम्ही उपस्थित केलात. मला सांगा की मुळात मागच्या पिढीला असे भावविश्व नव्हते का?

उत्तर : होते. प्रत्येक पिढीला स्वतःचे भावविश्व असते. प्रत्येक पिढीचे भावविश्व भिन्न असते. पूर्वीच्या पिढीचे भावविश्व अत्यंत मर्यादित होते. आत्ताच्या पिढीचे जे भावविश्व आहे, ते अमर्याद आहे. Sky is the limit. असे त्याचे स्वरूप आहे. पूर्वीच्या पिढीचे लोक सातासमुद्रापलिकडच्या गप्पा करायचे. आज मुलं ग्रहापलिकडच्या, परग्रहाच्या गप्पा करायला लागलीत. म्हणजे त्यांचे जे भावविश्व आहे, ते पृथ्वीतलावरचे राहिलेले नाही. ते उपजतच मंगळावर जाऊ लागलेत. चंद्राची गोष्ट ते प्लॉट घेणे, घर बांधणे अशा रूपात करतात. असे भावविश्व घेऊन आलेली आत्ताची पिढी आपल्या तुलनेनी, पूर्वपिढीच्या पार्श्वभूमीवर ख-या अर्थाने वैश्विक आहे, असे माझे म्हणणे आहे.

आकाश संवाद/११२