पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निवेदक - ही जाणीव तर सर निश्चितच समाजामध्ये निर्माण होईल. ठीक आहे, मागचा इतिहास सोडला तर आजपासून आपण इतिहासाला जपायला सुरुवात करूया. नक्कीच तुम्ही जे उपक्रम करत आहात, राबवत आहात त्याला अनेक लोक पुढे येऊन साहाय्य करतील.

डॉ. लवटे - एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, लक्षात आणून द्यायची आहे, ती अशी की आम्ही जी संग्रहालये उभारलीत ती इंटरनेटवर ‘यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यावर लोक जितक्या अधिक संख्येने पाहतात, भेट देतात, तेवढे प्रत्यक्षात लोक पहात नाहीत. म्युझियम प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट असल्याने लोकांनी म्युझियम्सना भेटी दिल्या पाहिजेत.

निवेदक - प्रत्यक्षसुद्धा लोक म्युझियम पहातील. लवटे सर, तुम्ही येथे आलात, संस्कृती जतन करण्याचे सर्वात मोठे साधन तुम्ही सांगितले. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे सर्व करू शकतो. इतिहास जर खरा जपायचा असेल तर या पद्धतीचा अवलंब होणे आवश्यक आहे. आपण आज इथे आलात, त्याबद्दल आभार!


• आकाशवाणी कोल्हापूर
• ८ एप्रिल, २०१६
• सकाळी ९.३० वा.

आकाश संवाद/११०