पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले. जिना उतरता उतरता मी एका मुलाला विचारलं की, “म्युझियम पाहून काय वाटले? विद्यार्थी उत्स्फूर्तपणे म्हणाला, “लेखक व्हावेसे वाटले. मला वाटतं ती प्रतिक्रिया आमच्या म्युझियमच्या यशाची पावती आहे. तुम्हाला ज्या प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे तशी ऊर्जा केंद्रे तुम्ही निर्माण करायला हवीत. अशी संग्रहालयं, स्मृती स्थानं ऊर्जा केंद्र हवीत, ती नवं निर्मिती केंद्र बनायला हवीत. बार्शीला मला आठवते की कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे स्मृती संग्रहालय उभारले. पाहून आलेल्या मुलीला विचारलं की काय वाटले तुला म्युझियम पाहन? तर ती म्हटली, 'मला मामा व्हायचंय!' मुलीला मामा व्हावंसं वाटणं... एक समाज सेवक व्हावंसं वाटणं महत्त्वाचं. परवाचीच गोष्ट सांगतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या म्युझियमचे उद्घाटन करण्यासाठीच्या प्रसंगी अनेक राजकीय लोक उपस्थित होते... अनेक आमदार, खासदार उपस्थित होते असे मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. मी नाव नाही सांगत पण त्यातले एक लोकप्रतिनिधी मला म्हणाले, तुम्ही म्युझियम केलेत पण आमची झोप उडवलीत हो." म्युझियम झोप उडवायचं कामही करतं.

प्रश्न - म्हणजे म्युझियम उभारल्याचं सार्थकच झाले?

उत्तर - सार्थक झालं. म्युझियम तुम्हाला अंतर्मुख करतात, म्युझियम तुम्हाला जगण्याची दिशा देतात, म्युझियम समाजात आदर्श प्रस्थापित करतात, म्हणून मला असे वाटते की आपण आपल्या पूर्वजांच्या सर्व पाऊलखुणा आपण घरोघरी जपणार नाही तोवर जुन्या गोष्टींचं जतन, संवर्धन होणार नाही. घरपण म्युझियम का नको असायला? पाटावरवंटा जपू नका पण कधीकाळी माझी आजी पाटावरवंट्यावर वाटायची तिच्या कष्टाची जाणीव जपली तर मला वेळ नाही म्हणून मी पुरणपोळी करणार नाही अशी गृहिणी मग म्हणणार नाही आणि ते क्षम्य असणार नाही.

प्रश्न - म्हणजे खरी दृष्टी व्यापक करण्याचं कार्य म्युझियम करतात का?

उत्तर - हो, हे कार्य शिक्षणातून, समाज शिक्षणातून व्हायला पाहिजे, लोक शिक्षणातून व्हायला पाहिजे, तर मग हा संस्कार आपण लोकशिक्षणातून देऊ शकू. याची गरज माणसाची समृद्धी जशी वाढेल तशी ती अधिक महत्त्वाची, अनिवार्य होईल. समृद्धी मागचे कष्ट, समृद्धी मागचा संघर्ष म्युझियम जपत असतात.

आकाश संवाद/१०८